ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस सुरु असून या पावसामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला ऐतिहासिक मासुंदा तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. हे पाणी जांभळी नाका रस्त्यावर साठल्याने ठाणे स्थानकाकडे जाणारी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच रस्त्यालगतच्या बाजारपेठेत पाणी शिरले आहे.
ठाणे शहरात रविवारपासून जोरदार पाऊस पडत असून सोमवारीही शहरात पावसाचा जोर कायम आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाणे शहरात झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. असे असतानाच, शहराचे प्रमुख आकर्षण आणि मध्यवर्ती भागात असलेला मासुंदा (तलावपाळी) तलाव मुसळधार पावसानंतर पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे.
तलावातील पाण्याची पातळी वाढल्याने अतिरिक्त पाणी बाहेर पडून जांभळी नाका रस्ता तसेच लगतच्या बाजारपेठ परिसरात शिरले. त्यामुळे या भागात पाणी साठले आहे. याच मार्गावरून ठाणे स्थानकाच्या दिशेने टीएमटीच्या बसगाड्या तसेच इतर वाहनांची वाहतूक सुरू असते. पाणी साठल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र, पालिकेने पंपाद्वारे पाण्याचा उपसा केल्यानंतर येथील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली असली तरी ती संथगतीने सुरू आहे.
मासुंदा तलावाकाठी दररोज हजारो ठाणेकर फेरफटका मारण्यासाठी, नौकाविहारासाठी आणि पर्यटनासाठी येत असतात. याशिवाय विविध धार्मिक कार्यक्रम, उत्सव यामुळे हा परिसर कायम गजबजलेला असतो. मात्र, पावसामुळे तलाव ओसंडून वाहू लागल्याने परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागला. जांभळी नाका परिसरातील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला, तर बाजारपेठेतील काही दुकानांमध्येही पाणी शिरल्याचे चित्र दिसून आले. पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सखल भागात सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
