ठाणे: मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील तलावांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. शहरातील ऐतिहासिक मासुंदा (तलावपाळी) तलाव तसेच उपवन तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहेत. तलाव परिसरात पाणी वाढल्याने आता या भागातील भर रस्त्यांवर सापांचा वावर वाढल्याचे प्रकार समोर येत आहेत.
मुसळधार पावसामुळे तलावांच्या काठावरील झुडपे, बिळे आणि सुरक्षित ठिकाणे पाण्याखाली गेल्याने साप बाहेर पडून रस्त्यांवर, पदपथांवर येत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी सकाळपासून मासुंदा तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला होता. तलावातील पाण्याची पातळी वाढल्याने अतिरिक्त पाणी बाहेर पडून जांभळी नाका रस्ता तसेच लगतच्या बाजारपेठ परिसरात शिरले. त्यामुळे या भागात पाणी साठले होते. हे पाणी पाहण्यासाठी अनेक नागरिक तलाव परिसरात गर्दी करून फोटो, व्हिडिओ काढत होते. यावेळी काही लहान मुले या साचलेल्या पाण्यात खेळत असल्याचे दिसून येत होते.
रात्रीच्या वेळी मासुंदा तलावाच्या रस्त्यावर पाण्यातील साप बाहेर साचलेल्या पाण्यात फिरत असल्याचे दिसून आले. तसेच उपवन तलावातील देखील साप बाहेर आल्याचे काही नागरिकांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, तलावांचे पाणी वाढल्याने नागरिक आणि पर्यटक मोठ्या संख्येने या परिसरात गर्दी करत आहेत. तलावातील पाण्याचे आकर्षण पाहण्यासाठी येणाऱ्या काही नागरिकांकडून सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. उपवन तलावात काही नागरिकांनी पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाले आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत वर्तकनगर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पावसाळ्यात तलाव, धरणे आणि जलस्रोतांमध्ये पाण्याची पातळी अचानक वाढत असल्याने दुर्घटनांचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी तलावात उतरणे, पोहणे किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
