ठाणे : ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून या पावसामुळे अनेक रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहतूकीचा वेग मंदावला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्याने चालक हैराण झाले होते. तर, भिवंडीतील अंतर्गत कशेळी -काल्हेर मार्गावर पाणी साठल्याने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. याठिकाणी नागरिक कोंडीत अडकून पडले होते. दरम्यान, घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी झाली नसली तरी उड्डाण पुलांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक संथगतीने सुरू असल्याचे चित्र दिसून आले. शीळफाटा मार्गावरील पाणी ओसल्यानंतर रस्त्याकडे कचऱ्याचे ढीग जमा झाल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. गुरूवारी शहरात ऑरेंज अलर्ट देण्यात होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा, पालिका तसेच स्थानिक यंत्रणा सर्तक होती. गुरूवारी सकाळी पावसाचा जोर कायम होता. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. सकाळच्या वेळेत सुरू असलेल्या पावसामुळे ठाणे शहरात सखल भागांमध्ये पाणी साठले होते. मात्र काही वेळात हे पाणी ओसरल्याचे दिसून आले. असे असले तरी गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागातील डांबरी रस्ते उखडले असून या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्याचे चित्र गुरूवारी दिसून आले.

मुंबई-नाशिक महामार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. नाशिक मार्गिकेवरील कल्याणफाटा येथे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावला असून वाहतूक अतिशय संथगतीने सुरू होती. यामुळे खारेगाव ते डोंगरातील रोड पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या कोंडीमुळे चालक तसेच प्रवासी हैराण झाले होते. तर, भिवंडीतील अंतर्गत कशेळी -काल्हेर मार्गावरील राहनाळ परिसरात पाणी साठल्याने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. याठिकाणी नागरिक कोंडीत अडकून पडले होते. दरम्यान, घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी झाली नसली तरी उड्डाण पुलांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक संथगतीने सुरू असल्याचे चित्र दिसून आले.

शीळफाटा कचरा ढिग

बुधवारी मुंब्रा-शीळ मार्गावर गुडघाभर पाणी साठल्याने या मार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला होता. वाहतूक ठप्प झाली होती. गुरूवारी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर येथील पाणी ओसरण्यास सुरूवात झाली. पण, कचऱ्याचे ढीग रस्तेकडेला साठल्याचे दिसून आले. यातून दुर्गंधी येत होती. तसेच रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

ठाणे शहरात ७४ तक्रारी

ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे १ जुलै सकाळी ८.३० ते २ जुलै सकाळी ८.३० या २४ तासांत एकूण ७४ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये २० ठिकाणी झाडे कोसळणे, १५ ठिकाणी झाडांच्या फांद्या पडणे, १३ धोकादायक झाडे, २० ठिकाणी पाणी साचणे, १ आगीची घटना, १ इमारतीचा भाग कोसळणे, १ पाणी वाहिनी गळती तसेच इतर ३ तक्रारींचा समावेश आहे. संबंधित विभागांनी तक्रारींवर आवश्यक ती कार्यवाही केली.