ठाणे : ठाणे जिल्ह्यात गुरुवारी ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात असून या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने परिस्थितीनुसार निर्णय स्थानिक स्तरावर घेण्याचे अधिकार दिले असले तरीही कोणतीही सुट्टी जाहीर करण्यात आलेली नव्हती. यामुळे गुरुवारी सकाळच्या सत्रातील शाळा नियमितपणे सुरू असल्याचे चित्र दिसून आले.
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने १ जुलै २०२६ रोजी वर्तविलेल्या अंदाजानुसार ठाणे जिल्ह्यात १ ते ३ जुलै या कालावधीत ऑरेंज अलर्ट, तर ४ जुलै रोजी रेड अलर्ट आणि ५ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. या कालावधीत अतिवृष्टी, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, तसेच काही भागांत पाणी साचणे, पूरपरिस्थिती निर्माण होणे आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच सतर्क रहावे असे आवाहन ठाणे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
या परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देऊन संबंधित शाळा व्यवस्थापनाने स्थानिक हवामान व पूरपरिस्थितीचा सातत्याने आढावा घ्यावा.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास संबंधित शिक्षण विभाग, स्थानिक प्रशासन, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी आवश्यक समन्वय साधून आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून शाळा सुरू ठेवणे अथवा बंद ठेवणे याबाबतचा योग्य निर्णय स्थानिक स्तरावर तात्काळ घेण्यात यावा. घेतलेल्या निर्णयाची माहिती संबंधित शिक्षण विभाग, पालक व स्थानिक प्रशासनास त्वरित उपलब्ध करून द्यावी, असे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.
ठाणे जिल्ह्यात गुरुवारी ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात असून सकाळपासून पावसाचा जोर कमी-अधिक होत आहे. मात्र, पाऊस सतत पडत आहे. जिल्हा प्रशासनाने परिस्थितीनुसार निर्णय स्थानिक स्तरावर घेण्याचे अधिकार दिले असून, सकाळी कोणतीही सुट्टी जाहीर करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे गुरुवारी सकाळच्या सत्रातील शाळा नियमितपणे सुरू असल्याचे चित्र दिसून आले. विद्यार्थी रेनकोट आणि छत्रीचा आधार घेत शालेय बस तसेच पालकांसोबत शाळेत जाताना दिसून आले. पावसामुळे अनेकांची तारंबळ उडताना दिसुन आली.
काही शाळांकडून पूर्व-प्राथमिक विभागाला सुट्टी
ठाणे शहरात पावसाचा जोर वाढल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही शाळांनी पूर्व-प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना गुरुवारी सुट्टी जाहीर केली. मुसळधार पावसामुळे लहान मुलांना शाळेत ये-जा करताना होणारा संभाव्य त्रास आणि गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे चिमुकल्यांचे पावसातील हाल टळले.
