ठाणे : ठाणे जिल्ह्यात २ ते ४ जुलैदरम्यान अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळांबाबत स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
प्रादेशिक हवामान विभागाने १ जुलै रोजी जारी केलेल्या अंदाजानुसार ठाणे जिल्ह्यासाठी २, ३ आणि ४ जुलै रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. या कालावधीत अतिमुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, ताशी वेगाने वाहणारे वारे, नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ, सखल भागांमध्ये पाणी साचणे तसेच घाट परिसरात भूस्खलनाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शिक्षण विभाग, महापालिका, जिल्हा परिषद आणि तहसील प्रशासनाला आवश्यक खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास संबंधित शिक्षण विभाग, स्थानिक प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन यांनी परस्पर समन्वय साधून स्थानिक हवामान परिस्थितीचा आढावा घ्यावा. त्यानंतर संबंधित भागातील शाळा नियमित सुरू ठेवायच्या की विद्यार्थ्यांना सुट्टी द्यायची, याबाबत परिस्थितीनुरूप निर्णय घ्यावा, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. तसेच घेतलेल्या निर्णयाची माहिती तातडीने पालक, शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासनाला उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने सर्व शाळांना स्थानिक हवामान आणि आपत्तीजन्य परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. आवश्यकतेनुसार आपत्कालीन यंत्रणांशी समन्वय साधून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, नागरिकांनी नदी-नाले, धबधबे आणि पूरप्रवण भागांपासून दूर राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा तसेच भारतीय हवामान विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी होणाऱ्या अधिकृत सूचना व इशाऱ्यांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
