झाड कोसळल्याने पोळी-भाजी केंद्राच्या गाडीचे नुकसान झाले.लोकसत्ता प्रतिनिधीठाणे- ठाण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच मनोरपाडा येथे ब्रम्हाळा तलावाजवळील पोळी-भाजी केंद्राच्या गाडीवर मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पावसाळा सुरू होताच ठाण्यात धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून ठाणे शहरात गेल्या २४ तासात म्हणजेच ५ जुलै सकाळी ८.३० ते ६ जुलै सकाळी ८.३० या २४ तासांच्या कालावधीत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे १८६ तक्रारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये ठाणे शहरात ११० झाडे कोसळल्याची नोंद आहे. झाडे कोसळून काही ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले आहे. असे असतानाच, मनोरपाडा येथील ब्रम्हाळा तलावाजवळ पोळी भाजी केंद्राच्या गाडीवर मोठे झाड कोसळले.
पावसामुळे झाडाची फांदी नव्हे, तर संपूर्ण झाडच पोळी-भाजी केंद्राच्या गाडीवर कोसळल्याने गाडीचा पुढील भाग, छप्पर, फलक तसेच गाडीतील काही साहित्य आणि आवश्यक कागदपत्रांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. झाड हटविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आणि परिसर सुरक्षित करण्यात आला.
या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. तसेच या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे जुन्या झाडांबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली. दिवसभर रस्त्यालगत उभ्या असलेल्या हातगाड्या, फेरीवाले आणि वाहनचालकांमध्ये धोकादायक झाडांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
ठाण्यात विविध ठिकाणी झाडे कोसळलीठाणे येथील लुईसवाडीतील आरटीओ कार्यालयाजवळ सोमवारी दुपारी पावसादरम्यान, झाड कोसळले. यावेळी तेथील रस्त्याने चालत असलेल्या धर्मवीरनगर येथील पांडुरंग भुवड या व्यक्तीच्या डोक्यावर झाड कोसळून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सुत्रांनी सांगितले.
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात मंगळवारी सकाळी भररस्त्यात झाड कोसळले. या घटनेत कार्यालयात पायी जात असलेले ५२ वर्षीय पवन झा हे जखमी झाले. तर, बस, टेम्पो, दोन कार, सहा दुचाकी आणि एका रिक्षेसह एकूण ११ वाहनांचे नुकसान झाले.
