ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या चार दिवसांत झालेल्या मुसळधार पावसादरम्यान शेकडो झाडे उन्मळून पडली असून सोमवारी त्यापैकी एक वृक्ष पडून पांडुरंग भूवड हे जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच, गुरूवारी सकाळी त्यांचा मृत्यु झाला. यामुळे मुंबईपाठोपाठ ठाण्यातही यंदा वृक्षपडझडीचा पहिला बळी गेल्याचे समोर आले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर वाढला. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस शहरात गेले तीन ते चार दिवस पडत होता. या पावसादरम्यान, शहरातील शेकडो झाडे कोसळली तर, झाड्यांच्या फांद्याही तुटून पडल्या. दिवसाला शंभरहून अधिक झाडे पडत होती. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि उद्यान विभागाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडे बाजूला करण्याचे काम करण्याचे काम करीत होती.
ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडे आणि झाडांच्या फांद्या कोसळण्याचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले असून याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन खडेबोल सुनावले होते. कर्तव्यात कसुर करत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला होता.
झाडे कोसळून काही ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले असेल तरी या घटनांमध्ये जीवितहानी झाली नव्हती. मात्र, शहरात दोन ठिकाणी झालेल्या घटनांमध्ये नागरिक जखमी झाल्याचे समोर आले होते. ठाणे येथील लुईसवाडीतील आरटीओ कार्यालयाजवळ सोमवारी दुपारी पावसादरम्यान, झाड कोसळले होते. यावेळी तेथील रस्त्याने जात असलेले धर्मवीरनगर येथील पांडुरंग भुवड या व्यक्तीच्या डोक्यावर झाड कोसळून ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.
दरम्यान, गुरूवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. या घटनेमुळे झाडे पडण्याच्या घटनांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
