ठाणे : ठाणे शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वृक्ष उन्मळून पडणे तसेच फांद्या तुटण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. उन्मळून पडलेले वृक्ष आणि तुटलेल्या फांद्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून रस्त्याच्या कडेला किंवा पदपथांवर हलवून ठेवण्यात येत आहेत. मात्र, त्यांची तातडीने विल्हेवाट लावली जात नसल्याने शहरातील बहुतांश अंतर्गत रस्त्यांवर हरित कचऱ्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे.
ठाणे शहरातील पदपथ आणि रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर विदेशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. मात्र, या वृक्षांच्या मुळांभोवती मोठ्या प्रमाणात काँक्रीटीकरण आणि डांबरीकरण झाल्याने त्यांची पकड कमकुवत झाली असून सोसाट्याचा वारा आणि पावसात वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. ठाणे शहरात सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३० या अवघ्या २४ तासांत तब्बल २०२ वृक्ष भुईसपाट झाले, तर ४५ वृक्षांच्या फांद्या कोसळल्या. यापैकी एका घटनेत वृक्ष अंगावर पडल्याने एका व्यक्तीला दुखापत झाली.
वृक्ष उन्मळून पडल्यानंतर त्याची छाटणी करून रस्ता मोकळा करण्याचे काम ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल तसेच संबंधित विभागांच्या कर्मचाऱ्यांकडून केले जाते. त्यानंतर हरित कचरा महापालिकेकडून उचलला जातो. परंतु शहरातील नौपाडा, गोखले रोड, गडकरी रंगायतन चौक, के व्हिला, वृंदावन, चरई यासह अनेक ठिकाणी खोड, फांद्या आणि इतर हरित कचरा पदपथांवर व रस्त्यालगतच पडून असल्याने नागरिकांना पदपथावरून चालणे कठीण झाले आहे.
अनेक ठिकाणी वाहनचालकांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत असून रस्त्याच्या कडेला पडलेल्या फांद्यांमुळे वाहतुकीवरही परिणाम होत आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीची समस्या देखील निर्माण होत आहे. छाटणी केलेल्या वृक्षांचे पाने, फांद्या रस्त्यावर पसरत असल्याचे दिसत आहे.
ठाणे शहरातील महत्त्वाच्या सर्व अंतर्गत रस्त्यांवर हरित कचरा पडला आहे. हरित कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावावी.
- रमेश देसले, प्रवासी.
