ठाणे : गेल्या आठवडाभरापासून ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर बुधवारीही कायम राहिला. मंगळवारी सकाळी आठ ते बुधवारी सकाळी आठ या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ११६.२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, एकूण सरासरी पर्जन्यमान ९७०.१३ मिलिमीटर इतके झाले आहे.
या सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, अंबरनाथ परिसरातील उल्हास नदीने दोन ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा कायम ठेवला आहे. तर गेल्या सात दिवसात ३०८ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत मुरबाडमध्ये सर्वाधिक १७० मिलिमीटर, त्यापाठोपाठ मिरा-भाईंदरमध्ये १३२ मिलिमीटर, अंबरनाथमध्ये १२० मिलिमीटर, शहापूरमध्ये ११८ मिलिमीटर, उल्हासनगरमध्ये ११२ मिलिमीटर, कल्याणमध्ये १०५ मिलिमीटर, ठाण्यात १०४ मिलिमीटर आणि भिवंडीत ६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचणे, झाडे कोसळणे आणि काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र आहे.
पावसामुळे जिल्ह्यातील नदीपात्रांनाही मोठा पूर आला आहे. अंबरनाथमधील जांभुळपाडा येथे उल्हास नदीची पातळी १४.८० मीटर, तर बदलापूर येथे १७.७० मीटरपर्यंत पोहोचून धोक्याची पातळी ओलांडली आहे. मोहने येथील उल्हास नदी तसेच टिटवाळ्यातील काळू नदी इशारा पातळीच्या वर वाहत असून प्रशासनाकडून या परिसरांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
सततच्या पावसामुळे गेल्या सात दिवसात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू, तर नऊ जण जखमी झाले आहेत. यामध्ये झाड कोसळणे, इमारतीचा स्लॅब कोसळणे, विजेचा धक्का आणि बुडून मृत्यू अशा घटनांचा समावेश आहे. याशिवाय भिवंडीतील दोन अल्पवयीन मुलांचा शोध अद्याप सुरू असून बचाव पथके शोधमोहीम राबवत आहेत.
पूर आणि दरडीच्या धोक्यामुळे प्रशासनाने विविध भागांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. आतापर्यंत २२९ कुटुंबांतील ७९७ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून, त्यापैकी ९४ कुटुंबांतील ३०८ नागरिक अद्याप निवारा केंद्रांमध्ये आहेत. शहापूर, अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड आणि ठाणे परिसरातील पूरग्रस्त व दरडप्रवण भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील लोकल रेल्वे
उशिराने सुरू असली तरी रस्ते वाहतूक सध्या सुरळीत आहे. पावसामुळे खासगी मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले असून एक पक्के घर पूर्णपणे, २६ पक्की घरे अंशतः आणि ८५ कच्ची घरे अंशतः बाधित झाली आहेत. भिवंडीमध्ये एका समाजमंदिरासह एका अंगणवाडीचेही नुकसान झाले आहे.
दरम्यान, बारवी, भातसा, तानसा आणि मोडक सागर धरणांमधील पाणीसाठ्यातही सातत्याने वाढ होत आहे. परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, एनडीआरएफ, पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची यंत्रणा सतर्क असून, नदीकाठ, धबधबे, पूरप्रवण भाग आणि दरडग्रस्त परिसरात नागरिकांनी जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
