ठाणे : ठाण्यात बुधवारी सकाळपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू असून सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. जांभळी नाका, वंदना बसस्थानक, गोखले रोडसह अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
ठाणे शहरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे. वाऱ्याचा वेग कमी झाला असला तरी विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जांभळी नाका बाजारपेठेतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
जांभळी नाका हा ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणारा प्रमुख मार्ग असून सकाळच्या वेळेत भाजीपाला खरेदीसाठी येथे मोठी गर्दी असते. मात्र पाणी तुंबल्याने पादचारी आणि ग्राहकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागला. याशिवाय वंदना बसस्थानक परिसर, गोखले रोड तसेच शहरातील इतर महत्त्वाच्या रस्त्यांवरही पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. तर दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना विशेषतः अडचणींचा सामना करावा लागला.
