ठाणे : मुंबई हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ठाणे शहरात शनिवार सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे ठाणे, दिवा, मुंब्रा, घोडबंदरमधील सखल भागात पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठाण्यातील वंदना सिनेमागृह परिसरातील रस्त्यावर साठलेल्या पाण्यात उतरून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नेत्यांसह सामाजिक कार्यकत्यांनी आंदोलन करत नालेसफाईच्या कामांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मुंबई हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी शनिवार, ४ जुलै आणि रविवार, ५ जुलैला रेड अलर्ट जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून ठाणे जिल्हा प्रशासनाने शनिवार, ४ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. अत्यावश्यक काम नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरताना दिसून येत आहे. शनिवार सकाळपासून जिल्ह्यासह ठाणे शहरात पाऊस सुरू असून त्या पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साठण्यास सुरुवात झाली असून ठाणे शहरात झाडे पडण्याचे सत्र सुरूच असून खारेगावमधील घटनेत दोन दुचाकीस्वार जखमी झाले आहेत.
ठाणे शहरातील वंदना सिनेमागृह, गोखले रोड, राम मारुती रोड, घोडबंदर महामार्ग यासह अनेक सखल भागात पाणी साठले आहे. या साठलेल्या पाण्यातून वाहनचालक वाट काढताना दिसून येत आहे. यामुळे येथे वाहतूक संथगतीने सुरू असल्याचे दिसून येते. दिवा, मुंब्रा आणि कळवा परिसरातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. पाणी साठण्याच्या प्रकारामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष मनोज प्रधान आणि सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे यांनी याठिकाणी अनोखे आंदोलन केले.
प्रधान यांनी मोठ्या टायर ट्युबमध्ये बसून साठलेल्या पाण्यातून प्रवास करत पालिकेच्या कारभाराव संताप व्यक्त केला. मागील ४० वर्षांपासून मी पाहत आहे की, दरवर्षी पहिल्या पावसात या ठिकाणी पाणी साचते. याची ठाणे महापालिकेलाही पूर्ण कल्पना आहे. मी वारंवार नाल्यांची योग्य प्रकारे सफाई झालेली नाही, त्याकडे लक्ष द्या, अशी मागणी केली होती. मात्र, मला सांगण्यात आले की नाल्यांच्या सफाईसाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात आले असून काम पूर्ण झाले आहे. पण प्रत्यक्षात ते १० कोटी रुपये जणू नाल्यातच वाहून गेले आणि परिस्थिती ”जैसे थे”च आहे, अशी टिका प्रधान यांनी केली.
