ठाणे : जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ठाणे जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावत सरासरीचे सर्वच अंदाज मागे टाकले आहेत. भारतीय हवामान विभागाने गेल्या काही दिवसांत रेड अलर्ट आणि त्यानंतर ऑरेंज अलर्ट जारी केल्यानंतर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळला. परिणामी, जुलै महिन्याच्या अवघ्या सात दिवसांत जिल्ह्यात ७७३.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सामान्यतः जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरासरी २१२.८ मिलिमीटर इतका पाऊस पडतो. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे.

एल निनोच्या पार्श्वभूमीवर यंदा पाऊस कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, जुलैच्या पहिल्याच आठवड्यात ठाणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावत सरासरीच्या साडेतीनपट अधिक वर्षावाची नोंद झाली आहे. जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या पर्जन्यमान अहवालानुसार, जुलैच्या पहिल्या सात दिवसांत झालेला पाऊस हा अपेक्षित सरासरीच्या साडेतीनपट असून, जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात अधिक पाऊस झाला आहे. सलग तीन ते चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड तसेच नवी मुंबई परिसरात अनेक ठिकाणी सखल भाग जलमय झाले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, रस्त्यांवर पाणी साचले, तर रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला.

दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. धबधबे, नद्या, तलाव, धरणे आणि गडकिल्ले या पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच शासकीय कार्यालयांना अर्धा दिवस सुट्टी, खासगी कार्यालयांना ”वर्क फ्रॉम होम”चा सल्ला देण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महापालिका, पोलीस आणि अग्निशमन दलाने विविध ठिकाणी मदतकार्य राबवत परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. हवामान विभागाने पुढील काही दिवसही अधूनमधून जोरदार पावसाची शक्यता वर्तविली असून, नागरिकांनी नदी-नाले, धबधबे आणि पूरप्रवण भागांपासून दूर राहावे तसेच प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तालुकानिहाय पर्जन्यमानात भिवंडीमध्ये सर्वाधिक ९३७.२ मिलिमीटर, ठाण्यात ९३२.९ मिलिमीटर, उल्हासनगरमध्ये ८३९ मिलिमीटर, अंबरनाथमध्ये ८१७.६ मिलिमीटर, कल्याणमध्ये ६९७.३ मिलिमीटर, शहापूरमध्ये ६५८.७ मिलिमीटर आणि मुरबाडमध्ये ६०९.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या सर्व तालुक्यांमध्ये जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षा लक्षणीय अधिक पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

यंदाच्या पावसाची तुलना गतवर्षीशी केली असता, जुलैच्या याच कालावधीत ठाणे जिल्ह्यात ६७४.७ मिलिमीटर पाऊस झाला होता, तर यंदा तो वाढून ७७३.१ मिलिमीटर झाला आहे. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास ९८.४ मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे.