ठाणे – ठाणे शहरात गेल्या २४ तासात मुसळधार पावसादरम्यान ११० झाडे कोसळली असून ३८ फांद्या तुटल्या तर १४ झाडे धोकादायक स्थितीत आहेत. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अशा घटना नागरीकांचा जीवितास धोकादायक ठरू लागल्या आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात दरवर्षी पावसाळ्यात झाडे पडण्याचे प्रकार घडतात. अशा घटनांमध्ये यापूर्वी नागरिकांना आपला जीव गममावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा घटना रोखण्यासाठी दरवर्षी पालिका पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करत असली तरी झाडे पडण्याचे प्रकार कायम असल्याचे दिसून येते. यंदाही झाडे पडण्याचे सत्र सुरूच आहे.
रविवारी शहरात जोरदार पाऊस झाला असून सोमवारीही शहरात पावसाचा जोर कायम आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाणे शहरात झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात म्हणजेच ५ जुलै सकाळी ८.३० ते ६ जुलै सकाळी ८.३० या २४ तासांच्या कालावधीत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे एकूण १८६ तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये ११० झाडे पडल्याच्या, ३८ झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या, १४ धोकादायक स्थितीतील झाडांच्या आणि ६ धोकादायक फांद्यांच्या तक्रारींचा समावेश आहे. म्हणजेच झाडांशी संबंधित तब्बल १६८ तक्रारी नोंदविण्यात आल्या. झाडे कोसळून काही ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले असेल तरी या घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही.
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि उद्यान विभागाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडे बाजूला करण्याचे काम केले. ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडे आणि झाडांच्या फांद्या कोसळण्याचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे.
झाडांव्यतिरिक्तही १८ तक्रारी
झाडांव्यतिरिक्तही गेल्या २४ तासांत पाणी साचण्याच्या ४, पाणीपुरवठा वाहिनी गळतीची १, स्लॅब कोसळल्याची १, कंपाऊंड वॉल कोसळल्याच्या २, धोकादायक कंपाऊंड वॉलची १, मेटल शेड कोसळल्याच्या २ आणि इतर स्वरूपाच्या ७ तक्रारी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींवर संबंधित विभागांकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली.
