ठाणे – ठाणे महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेला वृक्ष गणना अहवालात केवळ अक्षांश-रेखांशाच्या आधारे माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या माहितीच्या आधारे सामान्य नागरिकांना वृक्षांचे अचूक ठिकाण शोधणे कठीण जात आहे. म्हणून, नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे शहरातील वारसा वृक्षांची यादी जाहीर करावी अशी मागणी पर्यावरण तज्ज्ञ रोहित जोशी यांनी निवेदनाद्वारे महापालिकेला केली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर नवी मुंबई शहरातील वृक्ष गणनेचा अहवाल उपलब्ध आहे. यामध्ये शहरातील वारसा वृक्षांची सविस्तर माहितीसह त्याचा अचूक पत्ता मराठी भाषेत जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, ठाणे शहरातील वारसा वृक्षांची सविस्तर,अचूक पत्त्यासह आणि मराठीत यादी जाहीर करावी, अशी मागणी पर्यावरण तज्ज्ञ रोहित जोशी यांनी ठाणे महापालिकेकडे केली आहे. ठाणे महापालिकेच्या २०१७-२२ या कालावधीतील वृक्षगणना अहवालात वारसा वृक्षांची यादी इंग्रजीत प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतू , या अहवालात झाडांचे ठिकाण दर्शवण्यासाठी फक्त अक्षांश आणि रेखांश चा वापर करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा उपयोग मर्यादित राहत आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने त्यांच्या कायक्षेत्रातील वारसा वृक्षांचा जो अहवाल तयार केला आहे, तो नागरिकांसाठी अत्यंत सुस्पष्ट आणि उपयुक्त आहे. नवी मुंबईच्या यादीत प्रभाग, झाडाच्या ठिकाणाचा अचूक

पत्ता, झाडाचे नाव आण त्याचे अंदाजे वय अशी महत्त्वपूर्ण माहिती सविस्तरपणे दिली आहे. वृक्ष कायद्यातील अधोरेखित तरतुदिनुसार वृक्ष प्राधिकरणाचे पदसद्ध अध्यक्ष या नात्याने प्रत्येक वारसा वृक्षाचे जतन व संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे, असे पर्यावरण तज्ज्ञ रोहित जोशी यांनी निवेदनातून नमूद केले आहे. तसेच ठाणे महापालिकेने नवी मुंबईच्या धर्तीवर नवीन, अद्ययावत आणि मराठीत सविस्तर यादी तयार करून ती अधिकृत संकेतस्थळावर तातडीने प्रसिद्ध करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.अशी अचूक आणि सुलभ माहिती उपलब्ध झाल्यास नागरिकांमध्ये वारसा वृक्षांविषयी जागरूकता वाढेल आणि भविष्यात या दुर्मिळ वृक्षांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येईल, असा विश्वास देखील त्यांनी या निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.