ठाणे : धर्म, जात आणि पंथाच्या पलीकडे जाऊन बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यासाठी ठाण्यात गेल्या १७ वर्षांपासून हिंदू-मुस्लिम रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत रक्षाबंधन साजरे केले. या सोहळ्याला ३५०हून अधिक नागरिकांनी उपस्थिती लावत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

शिवमुद्रा प्रतिष्ठान (सामाजिक संस्था) आणि ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम महिला आणि बांधवांनी एकमेकांना राखी बांधत बंधुभावाचे नाते दृढ करण्याचा संदेश दिला. समाजात सलोखा कायम राहावा, जातीय तेढ निर्माण होऊ नये आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने गेल्या १७ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. दरवर्षी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

हा कार्यक्रम ठाण्यातील श्री ठाणा हालाई लोहाणा महाजन ट्रस्ट (रघुवंशी हॉल) येथे पार पडला. या सोहळ्याला माजी खासदार राजन विचारे, शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, आमदार संजय केळकर, पोलीस आयुक्तालय परिमंडळ-१ चे आयुक्त बाळासाहेब पाटील आणि कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांसह अनेक मान्यवर व्यक्ती, लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी यांची उपस्थिती होती.

यावेळी गेली १७ वर्षे हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन रक्षाबंधनाचा सण साजरा करत आहेत. समाजात एकोपा राहावा, कोणत्याही समाजात जातीय तेढ निर्माण होऊ नये आणि शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. पोलीस ठाण्याच्या मदतीने हा उपक्रम सुरू असून, त्यातून समाजाला बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

तसेच रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीच्या सुरक्षिततेची जबाबदारी भाऊ घेतो. त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक नागरिकाचे रक्षण करणे हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य आहे. विविध स्तरांवर अशा प्रकारचे उपक्रम सुरू झाले, तर समाजात जातीय तेढ निर्माण होण्यास आळा बसेल आणि सामाजिक सलोखा वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.