ठाणे : घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागातील एका शाळेतील विद्यार्थीनीने अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा दावा केल्याने या भागातील पालक धास्तावले आहेत. पोलिसांनी या प्रकरणानंतर सीसीटीव्ही फुटेज, शाळेच्या सुरक्षा रक्षकांची तसेच विद्यार्थीनीची चौकशी केली. परंतु प्राथमिक तपासात अपहरणाचा प्रयत्न असल्याचे अद्याप आढळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच कोणत्याही प्रकारे अफवा आल्यास नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन कासारवडवली पोलिसांनी केले आहे. दरम्यान, येथील नागरिकांच्या एका संस्थेने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांना गस्ती वाढविण्याची विनंती केली आहे.
काही दिवसापूर्वीच घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागातील शाळेच्या परिसरात दुपारी १ वाजता १२ वर्षाच्या विद्यार्थीनीने तिला मागून काळी साडी नेसलेल्या महिलेने अपहरणाचा प्रयत्न केल्याची माहिती तिच्या पालकांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून कासारवडवली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विद्यार्थीनी आणि तिच्या पालकांची विचारणा केली. तसेच घटनास्थळावर नेऊन तिच्यासोबत नेमका प्रकार कुठे घडला याची माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी शाळेच्या आवारातील, बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.
शाळेच्या सुरक्षा रक्षकांची चौकशी केली. दरम्यान, या घटनेनंतर घाबरलेल्या पालकांनी समाजमाध्यमावर प्रतिक्रिया देत विद्यार्थ्यांमध्ये भिती निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली होती. हिरानंदानी इस्टेट भागातील नागरिकांच्या एका संस्थेने देखील पोलिसांना गस्ती वाढविण्याची विनंती केली होती. पोलिसांनी सर्व स्तरातून अपहरणाच्या प्रयत्न प्रकरणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु सीसीटीव्ही किंवा चौकशीमध्ये प्राथमिक तपासात काहीही आढळले नाही.
नागरिकांनी घाबरू नये –
याबाबत कासारवडवली पोलिसांना विचारले असता, विद्यार्थीनीने दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही तपास केला. परंतु प्राथमिक तपासात अद्याप असा प्रकार आढळला नाही. तसेच अफवा आल्यास नागरिकांनी घाबरू नये असेही आवाहन त्यांनी केले.

