ठाणे : येथील हिरानंदानी मेडोज परिसरातील उघड्या नाल्यात मलनिस्सारण प्रकल्पातील पाणी सोडण्यात येत असून यामुळे या नाल्यातून पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवाशी हैराण झाले होते. तसेच त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता. त्यावर तोडगा म्हणून हा नाला बंदिस्त करून त्यावर चार्जिंग स्थानक उभारणीचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे हिरानंदानी मेडोजवासियांची नाला दुर्गंधीतून सुटका होण्याची चिन्हे आहेत.
हिरानंदानी मेडोजमधील इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांचे आरोग्य उघड्या नाल्यामुळे धोक्यात आले आहे. सुमारे ३०० फूट उघड्या नाल्यामध्ये मलनिस्सारण प्रकल्पाचे (एसटीपी) पाणी सोडण्यात येत असून यामुळे नाल्यातून मोठ्या प्रमाणात परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. शिवाय, त्यांची रात्रीची झोपही उडाली आहे. याबाबत येथील नागरिकांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावेळी केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही उपाययोजना सुचवल्या होत्या. तसेच सोमवारी केळकर यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत या नाल्याची पाहणी केली. यावेळी स्थानिक नगरसेविका स्नेहा आंब्रे, महापालिका अधिकारी खंडागळे आणि नागरीक उपस्थित होते.
पाहाणीदरम्यान, या नाल्यावर पीपीपी तत्वावर स्लॅब टाकून त्यावर चार्जिंग स्टेशन उभारण्याची सूचना केळकर यांनी अधिकाऱ्यांना केली. यामुळे परिसर दुर्गंधीमुक्त होऊन नागरीकांना दिलासा मिळेलच. शिवाय पीपीपी तत्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने महापालिकेवर देखील आर्थिक बोजा येणार नाही, असा दावा करत त्यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार लवकरच हा प्रस्ताव तयार करण्यात येऊन या कामाला गती मिळेल, आणि रहिवाशांना दिलासा मिळेल, अशी माहिती केळकर यांनी दिली.
