ठाणे : महिला आणि लहान बालकांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने राज्य शासनाकडून ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी उभारण्यात आलेले ‘हिरकणी कक्ष’ आज मोठ्या प्रमाणावर दुरावस्थेत असून अनेक ठिकाणी हे कक्ष बंद अवस्थेत असल्याचे चित्र आहे. रेल्वे स्थानके, बस स्थानके, महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयांसह विविध प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये सुरू करण्यात आलेल्या या कक्षांची आज अक्षरशः वाताहत झाली आहे. काही ठिकाणी या कक्षांवर कुलूप आहे, तर अनेक ठिकाणी धूळ, अडगळ आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.

हिरकणी कक्ष ही संकल्पना विशेषतः स्तनदा माता, गर्भवती महिला आणि लहान बालकांसह प्रवास करणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आली होती. महिलांना सार्वजनिक ठिकाणी बालकांना स्तनपान देता यावे, विश्रांती घेता यावी तसेच बालकांची स्वच्छता राखता यावी, यासाठी या कक्षांची उभारणी करण्यात आली होती. या कक्षांमध्ये खुर्च्या, पंखे, स्वच्छ पिण्याचे पाणी, बालकांसाठी डायपर बदलण्याची सुविधा, आरसे, स्वच्छतागृह, वॉश बेसिन तसेच काही ठिकाणी वातानुकूलित व्यवस्थाही करण्यात आली होती. अनेक ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करून या कक्षांचे व्यवस्थापन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आणि संवेदनशील मानल्या गेलेल्या या योजनेचे प्रारंभी मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले होते. रेल्वे स्थानकांवर प्रवासादरम्यान महिलांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन हे कक्ष सुरू करण्यात आले होते. त्याचप्रमाणे एसटी बस स्थानके, महापालिका मुख्यालये, रुग्णालये आणि विविध शासकीय कार्यालयांमध्येही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र कालांतराने देखभाल आणि व्यवस्थापनाच्या अभावामुळे अनेक कक्षांची अवस्था बिकट झाली आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई परिसरातील अनेक ठिकाणी हिरकणी कक्ष बंद असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही ठिकाणी हे कक्ष अडगळ ठेवण्याच्या जागा बनले आहेत, तर काही ठिकाणी वीज, पाणी आणि स्वच्छतेच्या सुविधाच बंद असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी फलक आहेत; मात्र प्रत्यक्ष सुविधा अस्तित्वात नाहीत. त्यामुळे महिला प्रवासी आणि माता वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.

महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेली योजना केवळ उद्घाटनापुरतीच मर्यादित राहिल्याची टीका आता होत आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या कक्षांची नियमित देखभाल, कर्मचारी नियुक्ती आणि वापरावर कोणतीही प्रभावी यंत्रणा नसल्याने शासनाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित प्रशासनाने तातडीने सर्व हिरकणी कक्षांची पाहणी करून ते पुन्हा कार्यान्वित करावेत, अशी मागणी केली आहे. बंद पडलेले कक्ष दुरुस्त करून त्यामध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच नियमित स्वच्छता आणि देखभालीसाठी स्वतंत्र निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

महिला आणि बालकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या गेलेल्या या उपक्रमाकडे संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात अंदाजे ६० ते ७० हिरकणी कक्ष विविध ठिकाणी उभारण्यात आले होते. मात्र, त्यातील बहुतांश कक्ष आज उपयोगाविना पडून असल्याचे वास्तव आहे.

ज्या ठिकाणी हिरकणी कक्ष बांधण्यात आले आहेत. त्याची निगा राखण्याचे काम त्या संबंधित विभागाचे आहे. तरीही ज्या ठिकाणी हिरकणी कक्ष बंद असतील त्याबाबत संबंधित विभागांनी त्याची माहिती घेऊन ते सुरू करण्याची प्रक्रिया करावी. – नमिता शिंदे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, ठाणे</strong>