ठाणे – ठाणे शहरात सोमवार पहाटेपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असून या पावसादरम्यान पोखरण रस्ता क्रमांक २ येथील गांधीनगर-सुभाषनगर परिसरात रस्त्याच्या मध्यभागी उभारलेले होर्डिंग अचानक कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, यानिमित्ताने शहरातील धोकादायक होर्डिंग्जचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ठाणे शहरात गेली दोन दिवस पावसाचा जोर वाढला आहे. सोमवार सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. याचं पावसादरम्यान, गांधीनगर-सुभाषनगर भागात रस्त्याच्या मध्यभागी उभारलेले एक मोठे होर्डिंग अचानक कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या मार्गावर सकाळच्या वेळेत वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु पावसामुळे शहरात शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या असून त्याचबरोबर नागरिकांही अत्यावश्यक असल्यास घराबाहेर पडण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. यामुळे रस्त्यावर वाहने कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ संबंधित यंत्रणेला माहिती दिल्यानंतर होर्डिंग हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. ठाणे शहरात अनेक ठिकाणी अशाच प्रकारची मोठी होर्डिंग्ज उभारण्यात आली आहेत. पावसाळ्यात अशी होर्डिंग्ज धोकादायक पडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे सर्व होर्डिंग्जची तातडीने संरचनात्मक तपासणी करून धोकादायक होर्डिंग्ज हटवावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
