ठाणे – जिल्ह्यातील होर्डिंग्ज पडून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व होर्डिंग्जचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे आणि धोकादायक आढळणारी होर्डिंग्ज तत्काळ हटवावीत, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत कोणतीही जीवितहानी होणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे, असेही त्यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

यावेळी ते बोलत होते. या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील रस्ते, धोकादायक इमारती, नालेसफाई, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य सुविधा आणि पावसाळी उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आणि एमएमआरडीए यांनी परस्पर समन्वय साधून प्रलंबित कामांना गती द्यावी, असे त्यांनी सांगितले.

रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविणे, सुरू असलेली कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून रस्ते सुस्थितीत आणणे तसेच धोकादायक पुलांचे तातडीने संरचनात्मक परीक्षण करण्याचे आदेशही त्यांनी दिले. मुरबाड आणि मुंब्रा येथे गतवर्षी झालेल्या दरड दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर घाट परिसरातील सुरक्षा कामांचाही आढावा घेण्यात आला. दोन्ही ठिकाणी सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यंदाच्या मान्सूनमध्ये ‘शून्य जीवितहानी’ हे उद्दिष्ट ठेवून सर्व विभागांनी एकत्रितपणे आणि अधिक दक्षतेने काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मान्सून उशिरा दाखल होत असल्याने नालेसफाईसाठी अतिरिक्त वेळ मिळाला असल्याचे सांगत उर्वरित नालेसफाईची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. रेल्वे हद्दीतील नाल्यांची स्वच्छता तातडीने पूर्ण करण्यासह त्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचेही त्यांनी सुचविले. ठाणे महानगरपालिकेच्या टीडीआरएफच्या धर्तीवर जिल्ह्यातील इतर महापालिकांनीही स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन पथके उभारावीत, असे आवाहन त्यांनी केले.

प्रत्येक महापालिका क्षेत्रात २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष सुरू ठेवून नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. याशिवाय झाडे कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक झाडांची छाटणी करावी, रेल्वे सेवा खंडित झाल्यास प्रवाशांच्या सुरक्षित सुटकेसाठी आपत्कालीन आराखडा तयार ठेवावा, सखल भागांतील पाणी उपसा यंत्रणा कार्यरत असल्याची खातरजमा करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पावसाळ्याच्या काळात साथीचे रोग पसरू नयेत यासाठी आरोग्य यंत्रणांनी सज्ज राहावे, शहरी व ग्रामीण रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा ठेवावा तसेच ग्रामीण भागात सर्पदंशावरील औषधे उपलब्ध करून द्यावीत, असेही त्यांनी सांगितले. नदीकाठच्या भागातील नागरिकांना गरज भासल्यास सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी बोटी, लाईफ जॅकेट आणि अन्य आवश्यक साहित्य सज्ज ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. लहान महापालिकांना तातडीच्या कामांसाठी निधीची आवश्यकता असल्यास जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून त्वरित मदत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

ठाणे जिल्ह्यातील मान्सून परिस्थिती हाताळताना सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परस्पर समन्वयाने काम करावे, स्थानिक लोकप्रतिनिधींशी सातत्याने संपर्क ठेवावा आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी सज्ज राहावे, असे आवाहन करत यंदाचा मान्सून समाधानकारक नसला तरी आपत्ती व्यवस्थापनात कोणतीही कसूर होता कामा नये, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

बैठकीत धोकादायक इमारतींच्या प्रश्नावरही सविस्तर चर्चा झाली. दरवर्षी त्याच इमारतींना धोकादायक घोषित करण्याऐवजी त्यांच्या पुनर्विकासाला गती देण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि मुंब्रा परिसरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ठाणे महापालिकेच्या धर्तीवर स्वतंत्र क्लस्टर सेल स्थापन करून क्लस्टर योजनांना प्राधान्य देण्याचे निर्देश संबंधित महापालिका आयुक्तांना देण्यात आले. त्यामुळे धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत धरून राहणाऱ्या नागरिकांना कायमचा दिलासा मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.