ठाणे – ठाणे शहरात मंगळवारी धुळवडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच सोसायट्या, चाळी, सार्वजनिक मैदानांत मोठ्या जल्लोषात रंगांची उधळण केली जात आहे. तसेच शहरात राजकीय धुळवडीचे रंग देखील दिसून आले. काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून तसेच विविध संस्थेच्यावतीने धुळवडीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांना ठाणेकर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. अभिनेते, कलाकारांनाही धुळवडीचा आनंद लुटला.

धुळवडीनिमित्त शहरात विविध सामाजिक संस्थांकडून तसेच राजकीय पक्षांकडून कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सोसायटी तसेच चाळीतील रहिवाशी एकत्र येऊन तरूण, तरुणी रंगाची उधळण करत, रंगाच्या पिचकाऱ्या मारत धुळवडीचा आनंद साजरा करत होते. धुळवडीनिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठा बंद होत्या. रस्त्यावरील वाहनांची वर्दळ तुलनेने कमी होती. रंगाची उधळण, अचानक अंगावर फेकला जाणारा रंगाचा फुगा, रस्तो रस्ती सुरू असलेले रंग फासण्याचे प्रकार त्यामुळे दुकानदारांनी दुकाने बंद ठेवणे पसंत केले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आनंद आश्रमात भेट देऊन दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला रंग लावला.

कळवा पारसिक नगर येथे राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) अभिजीत पवार यांनी यंदाही अभिजीत पवार आणि मित्र परिवारातर्फे ‘रंग दे कळवा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात तरुणांची मोठी गर्दी झाली आहे. विशेष आकर्षण म्हणून नृत्यांगना गौतमी पाटील हिने उपस्थिती लावली.

ठाण्यातील वृंदावन सोसायटी येथील रंग जल्लोष मित्र मंडळा तर्फे ‘रंग जल्लोष २०२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच स्वत्व संस्था आणि ठाणे उत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने कचराळी तलाव परिसरात ‘रंगपंचमी २०२६’ साजरी करण्यात आली. यामध्ये कलात्मक फेस पेंटिंग, कराओके, नृत्य सादरीकरण आणि पर्यावरणपूरक होळीचा संदेश देण्यात आला. तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

विशेष मुलांबरोबर विशेष होळी

विठाई प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांच्यावतीने सोमवारी महापालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेतील विद्यार्थ्यांसाठी होळीनिमित्त विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या होळीचे १९ वे वर्ष होते. सोमवारी होळी दहन केल्यानंतर मराठी आणि हिंदी गाण्यांच्या ठेक्यावर पर्यावरणपूरक रंगांचा वापर करत होळी साजरी केली. यावेळी या विद्यार्थ्यांबरोबर साजऱ्या केलेल्या होळीतील ऊर्जा आम्हाला संपूर्ण वर्षभर आमच्या दैनंदिन जीवनामध्ये काम करण्यासाठी एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते असे संस्थेचे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.