ठाणे : मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाच्या वापरावर काही प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आल्याचा परिणाम आता हॉटेल व्यवसायावर दिसू लागला आहे. ठाण्यात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने सुमारे ८०० लहान-मोठी हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर असल्याचा इशारा हॉटेल संघटनेने दिला आहे. विशेष म्हणजे गॅसची टंचाई ही प्रत्यक्षात पुरवठ्याअभावी नसून काळाबाजारीमुळे कृत्रिमरीत्या निर्माण झाली आहे, असा आरोपही संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाने याबाबत तातडीने कारवाई कशी मागणी देखील संघटेनच्या वतीने करण्यात आली आहे.
ठाणे हॉटेल संघटनेच्या वतीने बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी संघटनेच्या वतीने ठाण्यात सुरू असलेल्या असलेल्या हॉटेल व्यवसाय आणि गॅस पुरवठा बाबत माहिती दिली. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने ठाणे शहरातील हॉटेल व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाण्यात लहान-मोठी मिळून सुमारे ८०० हून अधिक हॉटेल्स, उपाहारगृहे आणि खाद्य व्यवसाय चालतात. मात्र गॅस पुरवठा कधीही खंडित होऊ शकतो, तसेच हॉटेल व्यवसायासाठी गॅस देणे काही काळासाठी बंद केले जाऊ शकते, अशी माहिती गॅस पुरवठादाराकडून मिळाल्याने हॉटेल चालक चांगलेच संभ्रमात पडले आहेत. तर सर्व हॉटेल चालकांकडे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत हॉटेल संघटनेने पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.
पत्रकार परिषदेत हॉटेल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या स्तरावर सध्या देशात किमान एक महिना पुरेल इतका एलपीजी गॅस साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात ठाणे शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा नियमितपणे होत नसल्याची तक्रार हॉटेल व्यवसायिकांकडून केली जात आहे. हॉटेल व्यवसाय प्रामुख्याने १९.५ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवर चालतो. शहरातील मोठ्या हॉटेल्समध्ये दररोज शेकडो ग्राहकांसाठी जेवण तयार केले जात असल्याने मोठ्या प्रमाणावर गॅसची गरज भासते. मात्र सध्या गॅसचा नियमित पुरवठा होत नसल्याने अनेक हॉटेल्सकडे केवळ काही दिवस पुरेल इतकाच साठा उरला आहे.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यात गॅस सिलिंडरची मोठ्या प्रमाणावर काळाबाजारी सुरू असल्याचा आरोप हॉटेल संघटनेने केला आहे. काही ठिकाणी व्यावसायिक सिलिंडर जादा दराने विकले जात असल्याच्या तक्रारी समोर येत असून त्यामुळेच कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून गॅस पुरवठा सुरळीत करावा तसेच काळाबाजारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. अन्यथा परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता असून येत्या रविवारीपर्यंत ठाण्यातील अनेक हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते, असा इशाराही हॉटेल संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
ठाणे शहर आणि परिसरातील हजारो नागरिकांचे रोजचे जेवण हॉटेल्स व भोजनालयांवर अवलंबून असल्याने ही परिस्थिती दीर्घकाळ राहिल्यास त्याचा परिणाम केवळ हॉटेल व्यवसायावरच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गॅस पुरवठा आणि काळाबाजारीचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी हॉटेल व्यवसायिकांकडून जोर धरू लागली आहे.
ठाणे शहरात अवघ्या ३० टक्के हॉटेलमध्ये पाईप लाईनद्वारे गॅस येतो. तर उर्वरित ७० ठिकाणी सिलिंडरद्वारे गॅस जातो. काही वर्षांपूर्वी एक अधिकारी होते त्यांनी कोणत्याच हॉटेल धारकांना गॅस लाईन जोडणी दिली नाही. यामुळे आज ही स्थिती उदभवली आहे. जर परवानगी मिळाली असती तर आज सर्व हॉटेलला गॅस पुरवठा झाला असता. असा आरोप देखील यावेळी हॉटेल संघटनेच्या माध्यमातून करण्यात आला.
