ठाणे : दोन हजार रुपये देण्यास नकार दिल्याच्या रागातून एकाने हॉटेलमध्ये कोयता घेऊन दहशत निर्माण करत तोडफोड केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात देशमुखविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याचा हा संपूर्ण प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.

तक्रारीनुसार, ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या कॅनॉन हॉटेलमध्ये मंगळवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास आरोपी मद्यधुंद अवस्थेत आला. त्याने हॉटेलमधील कर्मचाऱ्याकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. कर्मचाऱ्याने नकार दिल्यानंतर त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्याने हॉटेलच्या व्यवस्थापकांना मोबाइलद्वारे संपर्क साधून याची माहिती दिल्यानंतर आरोपीने त्यांनाही शिवीगाळ केली.

काही वेळाने आरोपीचा मित्र तेथे आला आणि त्याला घेऊन गेला. मात्र, सकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास आरोपी पुन्हा हॉटेलमध्ये आला. यावेळी त्याच्या हातात कोयता होता. त्याने कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच हॉटेलमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले. त्यानंतर त्याने हातातील कोयता हॉटेलच्या काचेवर फेकला. तसेच फर्निचरचे नुकसान झाले. या घटनेमुळे हॉटेलमधील ग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

याप्रकरणी हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून ठाणेनगर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्याआधारे पुढील तपास सुरू आहे.