ठाणे – पश्चिम आशियातील सुरू असलेल्या लष्करी संघर्षाचे पडसाद आता ठाण्यातील स्थानिक हॉटेल व्यवसायाच्या अर्थचक्रावर उमटू लागले आहेत. इंधनाच्या तुटवड्याने आधीच आर्थिक कोंडीत सापडलेल्या या क्षेत्राला आता कामगार टंचाईचा दुहेरी फटका बसत असून, ठाण्यातील हॉटेल व्यवसायिकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. व्यवसायातील अनिश्चितता आणि गावी असलेल्या कुटुंबाला या परिस्थितीत लागणारी मदत अशी कारणे देत ठाण्यातील बहुतांश हॉटेल मधील निम्म्याहून कामगार आपल्या गावी परतु लागल्याची माहिती ठाण्यातील विविध हॉटेल व्यावसायिकांनी दिली आहे.
पश्चिम आशियातील अस्थिरतेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम एलपीजी गॅसच्या उपलब्धतेवर झाला असून, व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा आणि दरवाढ यामुळे ठाण्यातील हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसू लागला. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस पुरवठ्यातील अडथळ्यामुळे अनेक हॉटेल्सना आपली वेळ कमी करावी लागली, काहींनी मेन्यू मर्यादित केला तर काहींना तात्पुरते हॉटेल बंद करण्याची वेळ आली. मध्यंतरी हा पुरवठा काही अंशी सुरळीत होता. मात्र पुन्हा गॅस टंचाईच्या झळा उद्योगाला बसू लागले आहेत. तर या इंधन संकटाचे पडसाद केवळ उत्पादनावरच नव्हे तर रोजगारावरही उमटू लागले आहेत.
गॅस टंचाईमुळे व्यवसायात घट झाल्याने उत्पन्न कमी झाले आणि त्याचा परिणाम थेट कामगारांवर झाला. अनिश्चित कामाचे तास, कमी पगार आणि पुढील काळाबाबतची असुरक्षितता यामुळे हॉटेलमध्ये काम करणारे अनेक कामगार आपापल्या गावी परतू लागले आहेत. परिणामी, ठाण्यातील बहुतांश हॉटेल्समध्ये कामगारांची संख्या निम्म्यावर आली असून, काही ठिकाणी तर अर्ध्याहून अधिक मनुष्यबळ कमी झाल्याचे चित्र आहे.
ठाणे शहरात सुमारे ८०० हुन अधिक हॉटेल्स कार्यरत आहेत. या हॉटेल्सपैकी मोठ्या प्रमाणावर लहान व मध्यम श्रेणीतील व्यवसाय आहेत, जे आधीच मर्यादित संसाधनांवर चालतात. सध्याच्या परिस्थितीत गॅस टंचाईसोबतच कामगारांची कमतरता भासू लागल्याने सेवा देण्याची क्षमता घटली आहे. ग्राहकांची मागणी असूनही पुरेशा मनुष्यबळाअभावी मागणी पूर्ण करण्यात अडथळे येत आहेत, तर काही ठिकाणी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे किंवा सेवा नाकारावी लागत आहे.
हॉटेल व्यावसायिकांच्या मते, गॅसचा नियमित पुरवठा होत नसल्याने नियोजन करणे अवघड झाले आहे. दररोजच्या कामकाजात अनिश्चितता वाढली असून, खर्च वाढत असताना उत्पन्न घटत आहे. दुसरीकडे, कामगार परत येईपर्यंत सेवा पूर्वपदावर आणणेही कठीण ठरत आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिक आर्थिक ताणाखाली आले असून, काहींनी पुन्हा काही दिवस व्यवसाय बंद करण्याचाही विचार सुरू केल्याचे सांगितले जाते.
शहरातील अनेक हॉटेलमध्ये काम करणारे कामगार सध्या आपल्या गावी परतत असून, या मागे केवळ रोजगारातील अनिश्चितता नव्हे तर त्यांच्या मूळ गावीही निर्माण झालेली गॅस टंचाई हे एक महत्त्वाचे कारण समोर येत आहे. गावाकडे कुटुंबीयांना गॅसची कमतरता भासत असल्याने अनेक कामगारांनी कुटुंबाच्या गरजेला प्राधान्य देत गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, काही हॉटेल व्यावसायिकांनी गॅसअभावी पर्यायी उपाय म्हणून पारंपरिक ‘चूल’ पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या पद्धतीत काम करणे कठीण, वेळखाऊ आणि आरोग्यासाठी त्रासदायक असल्याने अनेक कामगारांनी चूलवर काम करण्यास नकार दिला आहे. परिणामी, काही ठिकाणी कामगार आणि व्यावसायिकांमध्ये मतभेदही निर्माण झाले आहेत.
गॅस टंचाई आणि कामगारांची कमतरता या दुहेरी संकटात ठाण्यातील हॉटेल उद्योग सध्या तग धरून आहे. मात्र, परिस्थितीत लवकर सुधारणा झाली नाही, तर येत्या काळात या क्षेत्रासमोर अधिक गंभीर आव्हाने उभी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या अनेक हॉटेल मध्ये गॅस टंचाई समवेत कामगारांचा देखील तुटवडा आहे. – रघुनाथ शेट्टी, ठाणे हॉटेल असोसीएशन
