ठाणे : ठाण्यात लहान-मोठी मिळून सुमारे ८०० हून अधिक हॉटेल्स, उपाहारगृहे आणि खाद्य व्यवसाय सुरु आहेत. मात्र, मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने या व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व हॉटेल चालकांकडे पुढील पाच ते सहा दिवस चालेल इतकाच साठा असल्याची माहिती ठाणे हॉटेल संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान, काळ्याबाजारात सिलेंडरची विक्री केली जात असून त्यासाठी चारशे रुपये जास्त घेतले जात असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
मध्यपूर्वेत सुरु असलेल्या युद्धाच्या झळा आता भारतातल्या विविध क्षेत्रांना बसू लागल्या आहेत. तर यातील सर्वात महत्वाचे जागतिक पातळीवर खनिज तेल, एलपीजी, सीएनजी गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. याचा थेट फटका नागरिकांना बसू लागला आहे. घरगुती गॅस सिलिंडर देखील एका ठराविक कालावधीनंतरच ग्राहकांना मिळणार आहेत. तर हॉटेल व्यवसायिकांना लागणारे व्यावसायिक गॅस सिलिंडर पुरवठा लवकर बंद करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
हॉटेल व्यवसाय पूर्णपणे एलपीजी गॅसवर अवलंबून असल्याने या संभाव्य टंचाईचा थेट परिणाम शहरातील खाद्य व्यवसायावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गॅस पुरवठादारांकडून “कधीही पुरवठा थांबू शकतो” अशी सूचना देण्यात आल्याने अनेक हॉटेल व्यवसायिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त गॅस सिलिंडरचा साठा करून ठेवण्यास सुरुवात केली आहे.
मात्र सध्या बहुतांश हॉटेल्सकडे केवळ पुढील पाच ते सहा दिवस चालेल इतकाच गॅस साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ठाणे शहरातील हॉटेल व्यवसायाशी संबंधित विविध संघटनांनीही या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. गॅस पुरवठा दीर्घकाळ बंद राहिला तर शहरातील अनेक हॉटेल्सना तात्पुरते बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते, अशी माहितीही हॉटेल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच प्रशासनाने आणि संबंधित गॅस पुरवठा यंत्रणांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन हॉटेल व्यवसायासाठी गॅसचा नियमित पुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांच्या रोजगारावरही परिणाम..
गॅसचा पुरवठा अचानक खंडित झाल्यास हॉटेल व्यवसाय पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. रोज हजारो ग्राहकांवर अवलंबून असलेल्या या व्यवसायात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रोजगारावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. अनेक हॉटेल्समध्ये दररोज शेकडो ग्राहक येत असल्याने स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणावर गॅस लागतो. त्यामुळे पर्यायी इंधनावर तातडीने स्वयंपाक करणे व्यवहार्य नसल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
तर हॉटेल व्यवसायासमोर मोठे संकट
ठाणे हे मुंबई महानगर क्षेत्रातील वेगाने वाढणारे शहर असून येथे मोठ्या प्रमाणावर कामानिमित्त आणि प्रवासासाठी लोकांची वर्दळ असते. शहरातील हॉटेल्स, उपाहारगृहे आणि भोजनालयांवर हजारो नागरिकांचे रोजचे जेवण अवलंबून असते. त्यामुळे गॅस पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास त्याचा परिणाम केवळ हॉटेल व्यवसायावरच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या तरी हॉटेल व्यवसायिकांनी उपलब्ध साठ्यावर काम सुरू ठेवले असले, तरी पुढील काही दिवसांत परिस्थिती स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र गॅस पुरवठ्याचा प्रश्न लवकर मार्गी लागला नाही तर ठाण्यातील हॉटेल व्यवसायासमोर मोठे संकट उभे राहण्याची भीती हॉटेल चालकांकडून व्यक्त केली जात आहे.
हॉटेल व्यवसायासाठी गॅसची गरज किती?
ठाण्यातील हॉटेल आणि भोजनालयांमध्ये स्वयंपाकासाठी प्रामुख्याने १९.५ किलो क्षमतेचे व्यावसायिक एलपीजी सिलिंडर वापरले जातात. शहरातील मोठ्या हॉटेल्समध्ये दररोज शेकडो ग्राहकांसाठी जेवण तयार केले जाते. त्यामुळे अशा हॉटेल्सना दिवसाला सरासरी दोन सिलिंडरपर्यंत गॅसची आवश्यकता भासते. तर लहान हॉटेल्स आणि भोजनालयांमध्ये ग्राहकांची संख्या तुलनेने कमी असल्याने एक सिलिंडर साधारण दोन दिवस पुरतो, असे हॉटेल व्यवसायिकांचे म्हणणे आहे. मात्र सध्या गॅस पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने हॉटेल व्यवसायिकांकडे फक्त काही दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही, तर हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गॅस पुरवठा किती दिवस केला जाईल. याबाबत पुरवठा धारकांमध्ये देखील संभ्रम आहे. यामुळे किती दिवस पुरवठा होईल आणि कधी बंद होईल याबाबत पूर्ण माहिती नाही. सध्या पाच सहा दिवस जाईल इतका गॅस काही हॉटेल चालकांकडे आहे. मात्र त्यानंतर पुरवठा नाही झाला तर हॉटेल बंद होतील. याबाबत उपायोजना राबविणे गरजेचे आहे. – रघुनाथ शेट्टी, सचिव, ठाणे हॉटेल असोसिएशन
चार ते पाच दिवस पुरेल इतका गॅस साठा हाॅटेल व्यावसायिकांकडे उपलब्ध आहे. गॅस उपलब्ध झाला नाहीतर रविवारनंतर व्यवसायावर परिणाम होईल. आधीच गॅस दरात वाढ झाली आहे तर, गॅस विक्रि करणारे काहीजण काळ्याबाजारात चारशे रुपये जास्त घेऊन सिलेंडरची विक्री करत आहेत. तसेच शहरात ३० टक्के हाॅटेलमध्ये पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा होत आहे तर, उर्वरित ठिकाणी ही सुविधा नाही.- रत्नाकर शेट्टी, उपाध्यक्ष, ठाणे हॉटेल असोसिएशन
