ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील गृहंसकूलांच्या आवारात झाडे पडण्याचे प्रमाण सर्वाधिक असून संकुलांच्या आवारातील झाडांची जबाबदारी गृहनिर्माण संस्थेचीच आहे, असे स्पष्टीकरण आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिले. तसेच ज्या संकुलातून मागणी आली तिथे महापालिकेने पुढाकार घेऊन झाडांची छाटणी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी दुपारी महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन दिवसभरात प्राप्त झालेल्या तक्रारी, त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त जी.जी गोदेपुरे, उपनगरअभियंता शुभांगी केसवाणी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी उपस्थित होते.

पर्यावरणाचा समतोल राखत नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी झाडांची शास्त्रशुद्ध छाटणी केली जात आहे. गेल्या चार महिन्यांपासून शहरात सुमारे सहा हजारांहून अधिक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. सोसायटीच्या आवारातील झाडांची जबाबदारी संबंधित गृहनिर्माण संस्थेचीच आहे, असे स्पष्ट करत ज्या ठिकाणाहून मागणी आली तेथे महापालिकेने पुढाकार घेऊन छाटणी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या पावसासोबत जोरदार वारेही वाहत असल्याने झाडे आणि फांद्या पडण्याच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन प्रतिसादासाठी मनुष्यबळ दुप्पट करण्यात आले असून, छाटणीनंतर निर्माण होणारा हिरवा कचरा तातडीने उचलण्याचे कामही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सखल भागांवर लक्ष

शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटनांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना आयुक्त राव यांनी दिल्या आहेत. ज्या-ज्या भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी संबंधित विभागांनी सतत सतर्क राहून तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिकेच्या आपत्कालीन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

मास्टिक पद्धतीने खड्डे भरणार ठाणे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबतही महापालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. पावसाचा जोर कमी होताच मास्टिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खड्डे भरण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले जाईल. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सलग मुसळधार पाऊस सुरू आहे. खड्ड्यांचा सर्वाधिक त्रास दुचाकीस्वारांना होत असल्याने पावसातही खड्डे भरणी केली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीवर २४ तासांच्या आत कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जखमीवर यशस्वी शस्त्रक्रिया

झाड पडल्यामुळे पांडुरंग भुवड हे नागरिक जखमी झाले असून महापालिका अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे यांनी त्यांना तातडीने महापालिकेच्या महावीर जितो रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत आपण स्वतः माहिती घेत असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

होर्डिंग एजन्सीवर कारवाई ठाणे शहरातील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट मान्सूनपूर्व काळात पूर्ण करण्यात आले होते. तरीही ज्या ठिकाणी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली, तेथील होर्डिंग तातडीने हटविण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित जाहिरात एजन्सीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.