ठाणे : ठाणे आणि भिवंडी शहराच्या वेशीवर असलेल्या कशेळी गावातील खाडीकिनारी भागात भराव टाकून अतिक्रमण करण्यात येत असतानाच, येथील काही भागात भरावासाठी ठाणे महापालिका क्षेत्रातून जमा होणारा कचरा आणून टाकला जात असल्याची बाब नारपोली पोलिसांच्या कारवाईतून पुढे आली आहे. पालिकेच्या ठेकेदाराकडून या कचऱ्याचा पुरवठा केला जात असून याप्रकरणी पालिका ठेकेदारासह डम्परचालकांवर नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भिवंडी तालुक्यात कशेळी गाव येते. हे गाव ठाणे आणि भिवंडीच्या वेशीवर आहे. ठाणे आणि कशेळी गावाला लागूनच खाडी किनारा आहे. या खाडी किनारी भागात दोन्ही बाजुला गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमण वाढले आहे. खाडी किनारी भागातील खारफुटीवर भराव टाकून कांदळवन नष्ट केले जात असून याबाबतच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहे. खाडी किनारी भागात रात्रीच्या वेळेस मातीचा आणि कचऱ्याचा भराव टाकला जात असल्याच्या तक्रारी होत्या. परंतु त्यावर फारशी कारवाई होताना दिसून येत नव्हती. दरम्यान, नारपोली पोलिसांनी केलेल्या कारवाईतून खाडी किनारी भागात बेकायदा भराव होत असून त्यासाठी ठाणे महापालिकेचा ठेकेदार अनिल शर्मा हा कचऱ्याचा पुरवठा करत असल्याचे उघडकीस आले आहे.

हेही वाचा…मुंब्य्राच्या डोंगरात पाच मुले वाट चुकली, मदत यंत्रणांनी शोध घेऊन केली सुटका

नारपोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक बढे आणि पोलिस शिपाई स्वप्नील जाधव हे शुक्रवारी रात्री गस्तीवर होते. त्यावेळेस कशेळी पाईप लाईन मार्गे हायवे दिवा येथे जात असताना, त्यांना खाडी किनारी भागात डम्परद्वारे कचरा टाकून तो जेसीबीद्वारे पसरविला जात असल्याचे निर्दशनास आले. या कचऱ्यामुळे परिररातील नागरी वस्त्यांमध्ये दुर्गंधीबरोबरच रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने बढे आणि जाधव यांनी त्याठिकाणी कचऱ्याचे डम्पर खाली करून घेत असलेल्या यश पाटील आणि विकास सदाशिव पाटील यांच्याकडे विचारणा केली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली पण, पोलिसांनी कचरा टाकण्याच्या परवानगीबाबत विचारणा करताच त्यांनी याबाबत माहित नसल्याचे सांगितले. तसेच हा कचरा ठाणे महापालिकेचा असून पालिकेचा ठेकेदार अनिल शर्मा हा कचरा पाठवतो, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक भरत कामत यांच्या आदेशावरून पोलिस शिपाई जाधव यांनी दिलेल्या तक्रारवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा…कोलशेत खाडी भरावाप्रकरणाची होणार चौकशी; वनमंत्र्यांच्या आदेशामुळे अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात

सार्वजनिक ठिकाणी दुर्गंधयुक्त घाण कचरा टाकून परिसरातील नागरिकांच्या जिवीतास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली निष्काळजीपणाची, घातक कृती केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane illegal waste dumping by municipal contractor near kasheli village bay case registered psg
Show comments