ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील वेगाने वाढणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. मेट्रो मार्गिका, नवीन रस्ते आणि रेल्वे मार्ग अशा अनेक प्रकल्पांमुळे ठाणे जिल्हा मुंबईसह इतर जिल्ह्यांशी अधिक सक्षमपणे जोडला जाणार आहे. मात्र राज्याच्या २०२५-२६ आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीनुसार या बहुतेक प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी अजून किमान दोन ते तीन वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मात्र काही प्रकल्पांच्या कामांच्या प्रगतीची टक्केवारी पाहता दोन वर्ष देखील या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी कमी पडतील, असे ही स्पष्ट होत आहे. यामध्ये तिसरी चौथी मार्गिका, साकेत उन्नत मार्ग, ठाणे – बोरिवली भुयारी मार्ग, मेट्रो – ४, मेट्रो १२, मेट्रो ५ यांसह विविध महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.
ठाणे जिल्ह्यात गेल्या चार ते पाच वर्षांच्या कालावधीत विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची पायाभरणी झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये मेट्रो मार्गिका, रेल्वे मार्गिकांचा विस्तार, उन्नत मार्गांची उभारणी तसेच बुलेट ट्रेन प्रकल्प, मालवाहतूक विशेष रेल्वे मार्गिका यांसारख्या अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांचे काम जिल्ह्यात विविध ठिकाणी काम सुरु आहे. २०२५ मध्ये जाहीर झालेल्या या आर्थिक पाहणी अहवालात ठाणे जिल्ह्यातील अनेक वाहतूक प्रकल्पांच्या पूर्णत्वाचा अंदाजित कालावधी जाहीर करण्यात आला होता.
त्यानंतर यावर्षीच्या २०२६ च्या आर्थिक पाहणी अहवालात या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेत त्यांच्या सुधारित पूर्णत्वाच्या तारखा नमूद करण्यात आल्या आहेत. या तुलनेतून पाहता, बहुतांश प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून सुमारे दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर कामांच्या प्रगतीची टक्केवारी पाहता दोन वर्ष देखील या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी कमी पडतील, असे ही स्पष्ट होत आहे.
ठाणे जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या, वाढलेली वाहनसंख्या आणि रोजच्या प्रवासातील वाढती गर्दी लक्षात घेता मेट्रो मार्गिका, नवीन रस्ते, उड्डाणपूल आणि रेल्वे मार्गिका हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदर आणि इतर परिसरांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच मुंबई आणि पालघर यांसारख्या शेजारच्या जिल्ह्यांशी संपर्क अधिक वेगवान होणार आहे. दरम्यान, या प्रकल्पांच्या कामांना वेग देण्याचे प्रयत्न सुरू असले तरी जमीन संपादन, तांत्रिक प्रक्रिया आणि प्रशासकीय टप्पे यामुळे काही प्रकल्पांचा कालावधी वाढला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना वाहतूक कोंडीमधून पूर्णतः दिलासा मिळण्यासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
या प्रकल्पांचा समावेश: ( २०२५ – २६ राज्य आर्थिक पाहणी अहवालानुसार प्रकल्पांची माहिती )
रस्ते मार्ग
ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाचे काम – २०२८ मध्ये पूर्णत्वास जाणार
बाळकूम ते गायमुख ठाणे रास्ता – २०२८ मध्ये पूर्णत्वास जाणार
आनंद नगर ते साकेत उन्नत मार्ग – २०२८ मध्ये पूर्णत्वास जाणार
रेल्वे मार्गिका
कल्याण – बदलापूर तिसरी चौथी मार्गिका –
मार्च २०२७ मध्ये पूर्णत्वास जाणार ( आता पर्यंत फक्त ३० टक्के पूर्ण )
कल्याण – आसनगाव चौथी मार्गिका – डिसेंबर २०२६ मध्ये पूर्णत्वास जाणार ( आतापर्यंत फक्त १६ टक्के काम पूर्ण )
मेट्रो मार्गिका
ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो – जून २०३० मध्ये पूर्णत्वास जाणार
वडाळा – घाटकोपर – ठाणे – कासारवडवली – नोव्हेंबर २०२७ मध्ये पूर्णत्वास जाणार
गायमुख ते शिवाजी चौक ( मीरा रोड ) – मार्च २०३० मध्ये पूर्णत्वास जाणार
कल्याण तळोजा – डिसेंबर २०२७ मध्ये पूर्णत्वास जाणार
