Thane internal circular metro project route updates: ठाणे शहरात मुख्य मेट्रो चार (वडाळा-घाटकोपर-कासारवडवली) सोबतच अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो निर्माण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोच्या आराखड्याविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काही नियोजित अंतर्गत मेट्रो स्थानकांच्या आराखड्याचा अभ्यास पर्यावरणवादी आणि नगररचना अभ्यासकांनी केली असता, अंतर्गत मेट्रोची काही नियोजित स्थानके मेट्रो चार या प्रकल्पाच्या स्थानकांपासून अवघ्या काही मीटर अंतरावर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रवासी संख्येचे विभाजन आणि अनेक तांत्रिक अडचणी यामध्ये निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाणे शहराची वाहतूक कोंडी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रो चारच्या निर्माणाचे काम सुरु आहे. असे असतानाच शहरातील अंतर्गत भागांना जोडण्यासाठी ठाणे महापालिका आणि महामेट्रोच्या माध्यमातून १२ हजार २०० कोटी रुपयांचा अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प देखील सरकारने हाती घेतला आहे. ठाणे शहरातील पश्चिमेकडे २९ किमी लांबीची अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प आखला आहे. या प्रकल्पात २६ किमी उन्नत तसेच तीन किमीचा मार्ग भूमिगत आहे.

अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो ठाणे शहरातील अंतर्गत मार्गांवरुन धावणार आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत भागात मोठ्याप्रमाणात खोदकामे केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे ठाणे शहराच्या भौगोलिक रचनेवर परिणाम होणार असून पर्यावरणाची देखील मोठी हानी होणार असल्याचा आरोप सिटिझन्स फाॅर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ठाणे या संघटनेचा आहे. काही गृहसंकुलातील रहिवाशांनी देखील या प्रकल्पाला विरोध केला आहे.

या प्रकल्पाच्या आराखड्यावर सिटिझन्स फाॅर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ठाणे या संघटनेच्या सदस्यांनी अभ्यास केला. यामध्ये नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांचाही सामावेश होता. संघटनेने महामेट्रोच्या आराखड्यावरुन प्रत्यक्ष भागात जाऊन तसेच विविध विभागातील अभ्यासकांशी चर्चा केली असता, नियोजित स्थानकांच्या रचनेविषयी अनेक त्रुटी आढळल्या.
चौकट

त्रुटी काय आहेत?

  • घोडबंदर येथील डोंगरीपाडा या नियोजित अंतर्गत मेट्रो स्थानकाचा अभ्यास केला असता, हे त्याच रस्त्यावर मेट्रो-४च्या स्थानकाच्या समांतर असल्याचे आढळले. दोन्ही स्थानके घोडबंदर रस्त्याच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या एकाच परिसराला समांतर बांधली आहेत. दोन्ही स्थानकांचे प्राधिकरण वेगवेगळे आहे. त्यामुळे या स्थानकांचा वापर किती प्रवासी करतील असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
  • हिरानंदानी मेडोज येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळ अंतर्गत मेट्रो स्थानकाचे रेल्वे स्थानक उभारले जाणार आहे. या स्थानकापासून सुमारे ६०० मीटर अंतराहून कमी अंतरावर मेट्रो चार प्रकल्पाच्या मानपाडा स्थानक असेल. त्यामुळे अंतर्गत मेट्रो स्थानकाचा वापर तुलनेने कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
  • राबोडी आणि बालकुमपाडा ही नियोजित स्थानके मेट्रो-५च्या मार्गाशी मोठ्या प्रमाणात जुळणारी आहेत. या परिसरातील नागरिकांना मेट्रो-४ची दोन स्थानके (कापूरबावडी-बाळकूम) अवघ्या २ किलोमीटरच्या अंतरात सहज उपलब्ध आहेत. तसेच, मेट्रो-४ आणि मेट्रो-५ यांच्यात आधीपासूनच कापूरबावडी येथे जोडलेले स्थानकाची (इंटरचेंज) सुविधा असल्यामुळे प्रवाशांना एका मार्गावरून दुसऱ्या मार्गावर सहज जाता येते. यामुळे राबोडी आणि बालकुमपाडा येथे अंतर्गत मेट्रोची स्वतंत्र स्थानके उभारल्यास त्यांचा वापर अपेक्षेइतका होईल का, असा प्रश्न निर्माण होतो. कारण या भागातील प्रवाशांसाठी आधीच जवळपास मुख्य मेट्रोची पुरेशी सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे नवीन स्थानकांमुळे प्रवासी संख्या वाढण्याऐवजी त्याच प्रवाशांचे विविध स्थानकांमध्ये विभाजन होण्याची शक्यता आहे.
  • वागळे इस्टेट येथील अंतर्गत मेट्रोचे नियोजित रायलादेवी स्थानक हे मेट्रो-४ वरील मुलुंड नाका आणि तीन हात नाका या स्थानकांच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे या भागात स्थानकांमधील अंतर तुलनेने कमी राहते. तसेच, वर्तुळाकार ठिकाणी मॉडेल मिल परिसरात हा मेट्रो मार्ग मेट्रो-४च्या मार्गाला छेद देतो. येथे मेट्रो मार्ग उन्नत (एलिव्हेटेड) जात असल्याने दोन्ही मार्ग एकमेकांच्या जवळून जात असले तरी त्यांच्यात थेट जोडणी (इंटरचेंज) प्रस्तावित नाही.

ठाणे शहरातील बहुतांश नोकरदार कामानिमित्ताने मुंबईत प्रवास करतात. अंतर्गत मेट्रो ही ठाणे शहरासाठी मर्यादित आहेत. त्यातच अंतर्गत मेट्रो आणि मुख्य मेट्रो चारचे काही स्थानक अत्यंत जवळ असतील. त्यामुळे अंतर्गत मेट्रोच्या प्रवासी संख्येविषयी प्रश्न निर्माण होत आहेत. दोन्ही मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याबाबत समन्वय साधायला हवा होता. – निशांत बंगेरा, सिटिझन्स फाॅर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ठाणे.