ठाणे : अंतर्गत मेट्रोला ठाणे शहरातील गृहसंकुलातील रहिवासी, अभ्यासकांकडून विरोध केला जात असतानाच आता कोळी समजाकडूनही तीव्र विरोध होऊ लागला आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील चेंदणी कोळीवाडा येथील रहिवाशांनी बैठक घेऊन हा प्रकल्प त्यांच्या संस्कृती आणि परंपरेवर विपरीत परिणाम करणारा ठरणार असल्याचे म्हटले. त्यामुळे हा प्रकल्प आणखी वादात अडकण्याची शक्यता आहे.

ठाणे शहरातील अंतर्गत मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सध्या ठाणे शहरात सुरु आहे. महामेट्रोच्या माध्यमातून या प्रकल्पाचे निर्माण केले जात आहे. १२ हजार २०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाविषयी घोडबंदर, वसंत विहार भागातील काही नागरिकांकडून तीव्र विरोध केला जात आहे. हा प्रकल्प पांढरा हत्ती ठरणार असल्याची भिती नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी व्यक्त केली आहे.

तसेच त्यांच्याकडून प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानाबाबत जनजागृती देखील केली जात आहे. प्रकल्पा अंतर्गत दोन नियोजित स्थानके भुमीगत असणार असून त्यापैकी एक स्थानक हे ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एसटी थांब्याजवळ उभारला जाणार आहे. या एसटी थांब्यापासून काही मीटर अंतरावर चेंदणी कोळीवाडा हे गाव आहे. पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या या भागात ३ हजार ५०० हून अधिक कोळी समाज राहतो.

या गावातील नागरिकांकडून आता प्रकल्पास तीव्र विरोध होऊ लागला आहे. मंगळवारी त्यांची परिसराती मंदिरात बैठक झाली. भुयारी प्रकल्पामुळे खोदकामातून अनेक अडचणींचा सामना गावकऱ्यांना सहन करावा लागू शकतो. यापूर्वी देखील चेंदणी कोळीवाड्यातील कोळी समाजातील गावकऱ्यांच्या जमिनी रेल्वेच्या प्रकल्पात संपादित झाल्या. सिडको येथील जमीन देखील बस थांब्याच्या निर्माणासाठी गावकऱ्यांनी दिली. खाडी प्रदूषित झाल्याने मासेमारीवर परिणाम झाला.

या पूर्वीच्या प्रकल्पांमुळे गाव आक्रसून गेले. भूमिगत स्थानकामुळे येथील २०० मीटर भागात परिणाम होणार आहे. तसेच सीमांकण झाले नसतानाही प्रकल्प का राबविला जात आहे अशी विचारणा कोळी समाज करत आहे. स्थानक परिसरात खोदकाम झाल्यास पूराचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच खोदकामे आणि इतर कामांमुळे दुर्घटना देखील घडू शकते असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

सीमांकण होत नाही तो पर्यंत कोणताही प्रकल्प राबवू नका अशी आमची भूमिका आहे. अंतर्गत मेट्रो प्रकल्पासाठी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात भुयारी स्थानक उभारले जाणार आहे. यापूर्वी चेंदणी कोळीवाड्यातील नागरिकांनी रेल्वेच्या प्रकल्पासाठी त्यांच्या जमीनी दिल्या होत्या. आता हा अंतर्गत मेट्रो प्रकल्प राबविला जात असल्याने त्याचाही परिणाम आम्हाला सहन करावा लागणार आहे. याबाबत मंगळवारी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला आहे. – सचिन ठाणेकर, सदस्य, चेंदणी कोळीवाडा सिमांकण समिती.