ठाणे : ठाणे शहरातील पश्चिमेकडील भागात अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोच्या कामांना सुरुवात झाली आहे. परंतु या प्रकल्पास ठाण्यातील काही नागरिकांनी विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी सिटिझन्स फाॅर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ठाणे या संघटनेने आणि काही रहिवाशांनी पत्रकार परिषद घेऊन अंतर्गत मेट्रो प्रकल्पातील आराखड्याबाबत गंभीर मुद्दे उपस्थित केले. तसेच हा प्रकल्प ठाणेकरांवर लादला जात असल्याचे म्हटले. या प्रकल्पामुळे ठाणे रेल्वे स्थानक परिसर, पर्यावरणास गंभीर आणि शहराच्या रचनेवर परिणाम होणार असून प्रकल्प पांढरा हत्ती ठरण्याची शक्यता व्यक्त केली.
वसंत विहार येथील ईडन वुड्स या गृहसंकुलातील क्लब हाऊसमध्ये शनिवारी सिटिझन्स फाॅर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ठाणे या संघटनेने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी नगररचनाकार, लेखिका आणि वास्तुविशारद सुलक्षणा महाजन, वकील हेमा रमानी, पर्यावरणतज्ज्ञ डाॅ. नागेश टेकाळे तसेच ठाण्यातील काही रहिवासी उपस्थित होते. सिटिझन्स फाॅर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ठाणे यांनी मागील दोन महिन्यांपासून अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोसंदर्भात अभ्यास केला होता. त्याचे सादरीकरण देखील करण्यात आले.
ठाणे शहरातील पश्चिमेकडे २९ किमी लांबीची अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प आखला आहे. या प्रकल्पात २६ किमी उन्नत तसेच तीन किमी भूमिगत मार्गिका आहे. १२ हजार २०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाविषयी पर्यावरणवाद्यांनी तसेच काही संस्थांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. सुलक्षणा महाजन यांनी डोंगरीपाडा, बाळकुम, रायलादेवी तलाव येथील वर्तुळाकार मेट्रोच्या प्रस्तावित स्थानकाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा प्रकल्प घोडबंदर-घाटकोपर-वडाळा या मेट्रो चार या प्रकल्पाला छेदून जात असल्याचे म्हटले. त्यामुळे हा प्रकल्प मेट्रो चारहून अधिक उन्नत असेल. प्रकल्प ‘रोलर कोस्टर’ प्रमाणे भासणार आहे असे महाजन म्हणाल्या.
सर्वात गंभीर परिणाम ठाणे रेल्वे स्थानक परिसरात होणार आहे. या परिसरात वर्तुळाकार मेट्रोचे स्थानक भुयारी पद्धतीने ठाणे रेल्वे स्थानकाजवळ केले जाणार आहे. त्यासाठी
अनेक रहिवाशांच्या इमारती, दुकाने पाडावी लागणार आहेत. तसेच स्थानक परिसरात २०० मीटर लांब आणि २० मीटर खोल खड्डे करावे लागतील. सॅटीस प्रकल्पाचा काही भाग, ठाणे स्थानकाजवळील एसटी थांबा, रेल्वे स्थानक तिकीट नोंदणी केंद्राचा भागही तोडला जाणार आहे. येथील गावठाणामध्ये नागरिकांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यांना याबाबत कोणतीही माहिती प्रशासनाकडून दिली गेली नाही असा आरोपही त्यांनी केला.
या प्रकल्पा २९ किमी अंतरामध्ये ८२ आडवे वळणे आहेत. यातून गुंतागुंत, मार्गिकेची झीज, देखभाल खर्च, दीर्घकालीन परिचलनास जोखीम वाढविणारे ठरेल. भूमिगत मार्गिकेमुळे भूजल गळती, बोगद्यावर असलेल्या जुन्या इमारतींच्या पायाला धोका, भिंतींना तडे अशा समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. ठाण्यातील ६७ टक्के रस्ते हे २० मीटरपेक्षा अरुंद आहेत. आराखड्यामध्ये प्रस्थावित स्थानकांपर्यंत बसगाड्या, पादचारी मार्ग किंवा सायकलच्या दळण-वळणासाठी पुरेसे नियोजन नाही. त्यामुळे प्रस्तावित स्थानकाबाहेर गर्दी निर्माण होणार आहे असे संघटनेने स्पष्ट केले.
ठाणे अंतर्गत मेट्रोचा प्रकल्प महामेट्रोच्या माध्यमातून केला जात आहे. महामेट्रोच्या माध्यमातून नागपूरमध्ये मेट्रो सेवा सुरु करण्यात आली होती. आता ठाणे अंतर्गत मेट्रोसाठी तपशील अहवाल तयार करताना नागपूरचा संदर्भ देण्यात आला आहे. नागपूर आणि ठाणे शहराची भौगोलिक रचना वेगळी आहे. असे असतानाही नागपूर मेट्रो तपशील अहवालातील मजकूर नक्कल करण्यात आला असावा किंवा ठाणे अंतर्गत मेट्रोसाठी सर्वेक्षण केले नसावे असा आरोप सुलक्षणा महाजन यांनी केला.
देशातील बहुतांश मेट्रोत अंदाजित प्रवासी संख्येच्या केवळ २५ ते ३० टक्के प्रवासी प्रवास करतात. मेट्रो तीन प्रकल्पात दिवसाला चार लाख प्रवाशांचा अंदाज होता. ऑक्टोबर २०२५ मध्ये केवळ दीड लाख प्रवासी प्रवास करत होते. मोनोरेलमध्ये अंदाजे दीड ते तीन लाख प्रवासी अपेक्षा होती. सप्टेंबर २०२५ मध्ये मोनोरेल स्थिगित झाली. या मोनोरेलमधून १८ ते १९ हजार प्रवासी प्रवास करत होते. तर गुरुगाव येथील रॅपिड मेट्रो प्रकल्पात एक लाख प्रवासी दिवासाला प्रवास करण्याचा अंदाज होता, परंतु ४८ ते ५३ हजार प्रवासी प्रवास करतात. ठाणे अंतर्गत मेट्रोमधून २०२९ पर्यंत दिवसाला अंदाजे ६.४७ प्रवासी प्रवास करतील असा दावा केला जात असून याविषयी संघटनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पर्यावरणतज्ज्ञ डाॅ. नागेश टेकाळे यांनीही वृक्ष छाटणीविषयी प्रश्न उपस्थित केले. हा प्रकल्प उन्नत असून प्रकल्पा राबवायचा असल्यास वृक्षाच्या फांद्या छाटून प्रकल्प तयार करता आला असता, असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पात ३ हजार २२४ वृक्ष बाधीत होणार आहेत. ठाणे ग्रीन कलेक्टिव्ह या संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण ३ हजार ५८० इतके असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. तसेच ठाणे महापालिकेने बाधीत होणाऱ्या वृक्षांमध्ये वारसा वृक्षांची मोजणी कमी असल्याचा दावा संघटनेने केला. महापालिकेने केवळ ९ वारसा वृक्षांची नोंदणी केली. तसेच १०० वर्षांवरील एकही झाडाची नोंद महापालिकेने केली नाही. परंतु सर्वेक्षणात १४ वृक्ष आढळून आली. तर शिवाईनगर ते नीळकंठ या पट्ट्यात १४७ वर्ष जुने चिंचेचे वृक्ष आढळून आले.
ठाणे शहराला चांगली सार्वजनिक वाहतूक हवी आहे. परंतु तथ्यांवर आधारित आणि सहभागात्मक नगर नियोजनाचीही गरज आहे. प्रस्तावित वर्तुळाकार मेट्रोत आर्थिक तोटा, पर्यावरणाची हानी होणार आहे. हे सर्व १२ हजार २०० कोटी रुपयांतून. प्रशासनाने जबाबदारीने नियोजन करणे आवश्यक असल्याचे सिटिझन्स फाॅर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ठाणे या संघटनेने म्हटले.
