ठाणे – १२ हजार कोटींचा खर्च करून उभारण्यात येणाऱ्या ठाणे अंतर्गत मेट्रोचा बहुसंख्य टक्के ठाणेकरांना थेट फायदा होणार नसल्याने हा प्रकल्प नागरिकांच्या दृष्टीने उपयोगाचा नाही, असे ठाम मत तज्ज्ञांनी रविवारी नागरी सभेत बोलताना व्यक्त केले. साडेचार लाख प्रवाशांचा दावा अद्याप सिद्ध झालेला नसल्याचा दावा करत, मेट्रोवरील खर्चाऐवजी ५०० कोटी रुपये मूलभूत वाहतूक सुविधांवर खर्च केल्यास ९० टक्के नागरिकांच्या समस्या सुटू शकतात, असा दावाही त्यांनी केला. मोठ्या प्रकल्पांपेक्षा सार्वजनिक वाहतूक, पादचारी सुविधा आणि स्थानिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची गरज असल्याचा सूरही त्यांनी यावेळी लावला.

मराठी विज्ञान परिषद, मुंबई आणि जिज्ञासा, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ठाणे शहरासाठी लोककेंद्री वाहतूक कशी असावी’ या विषयावर रविवारी नौपाड्यातील सरस्वती विद्यालयात नागरी सभा झाली. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, मराठी विज्ञान परिषदेचे सचिव अ. पा. देशपांडे, जिज्ञासाचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे, वास्तुविशारद व नगररचनाकार सुलक्षणा महाजन यांच्यासह नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना महाजन यांनी ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अंतर्गत मेट्रोसाठी १२ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून, त्यात ठाणे महापालिकेचे ३५० कोटी रुपये आहेत. हा पैसा ठाणेकरांचा आहे.

प्रकल्पाला आणखी विलंब झाल्यास खर्च २५ हजार कोटींवर जाण्याची शक्यता असून, तो पूर्ण होईल की नाही, याबाबतही प्रश्नचिन्ह आहे, असे महाजन म्हणाल्या. २०३६ मध्ये केवळ ३२ टक्के लोकसंख्येलाच मेट्रोची थेट उपलब्धता असेल, तर कळवा, मुंब्रा, दिव्यासह ६८ टक्के ठाणेकर या प्रकल्पाच्या फायद्यापासून दूर राहतील, असा दावा त्यांनी केला. ठाणे स्थानक परिसरातील भुयारी कामातून तब्बल एक लाख टन राडारोडा निघणार असून, तो कुठे टाकणार, असा प्रश्न उपस्थित करत या प्रकल्पामुळे लोकवस्ती आणि व्यावसायिक गाळे बाधित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जगभरातील विविध शहरांमध्ये वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास केलेल्या ठाणेकर तज्ज्ञांना एकत्र आणून शहराच्या वाहतूक समस्येवर स्थानिक आणि शाश्वत उपाय शोधण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. वास्तुविशारद समीर शेख यांनी ठाणे शहरातील गिळंकृत केलेल्या पदपथाविषयी भाष्य केले. तर वास्तुविशारद निकिता सराफ यांनी बंद पडलेल्या काराखान्यांच्या जागांवर होत असलेली रहिवासी बांधकांमांविषयी माहिती दिली.

ठाणे शहराच्या वाढत्या विस्तारासोबत वाहतूक समस्याही गंभीर झाली आहे. सार्वजनिक वाहतूक अपुरी, अविश्वसनीय आणि असुरक्षित होत असताना उड्डाणपूल, बोगदे, महामार्ग आणि मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पांवर भर दिला जात आहे. मात्र, पादचारी, सायकलस्वार आणि सामान्य प्रवाशांच्या गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत वास्तुविशारद तृप्ती बिश्वास यांनी व्यक्त केली. वाहतूक धोरण हे ‘वापरकर्ता-केंद्रित’ आणि ‘वापरकर्ता-स्नेही’ असावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. ठाणे शहर कायमस्वरूपी बांधकामाच्या ठिकाणासारखे झाले असून, प्रकल्पांची गरज, खर्च आणि त्याचा नागरिकांना होणारा फायदा याबाबत पारदर्शकता आवश्यक असल्याचे सामाजिक कार्यकर्ते उन्मेष बागवे यांनी सांगितले.

सार्वजनिक वाहतुकीत पुरेशी गुंतवणूक होत नसताना मोठ्या प्रकल्पांवर होणारा खर्च आणि पर्यावरणाची हानी यांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सतत सुरू असलेल्या बांधकामांमुळे ठाणे ‘तलावांचे आणि हरित शहर’ या ओळखीपासून दूर जात असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या रचना वैद्य यांनी केली. वाढती अवजड वाहतूक, धूळ आणि प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, प्रत्येक प्रकल्पात पर्यावरणीय परिणामांचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ठाणे ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यापूर्वी मूलभूत वाहतूक व्यवस्था आणि पादचारी सुविधा स्मार्ट करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे स्थानक परिसर, घंटाळी, राम मारुती रोड आणि वागळे इस्टेट परिसरातील पादचारी आणि रिक्षा वाहतुकीच्या समस्यांकडे सामाजिक कार्यकर्त्या वर्षा वैद्य यांनी लक्ष वेधले. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिलांसाठी सुरक्षित व सोयीस्कर पादचारी मार्ग उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

कळवा परिसरातील वाहतुकीच्या समस्यांवर भाष्य करताना सामाजिक कार्यकर्ते कल्पक राऊत यांनी कळवा-मुंब्रा भागातून ठाणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांना दररोज मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. मोठे प्रकल्प सुरू असूनही दैनंदिन प्रवाशांच्या प्रत्यक्ष गरजा पूर्ण होत नसल्याने वाहतूक नियोजनाचा फेरविचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पार्किंगच्या समस्येवर उपाय म्हणून प्रभावी पार्किंग धोरण राबविण्याची गरज नगररचनाकार प्राची देशपांडे यांनी व्यक्त केली. रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक आणि पादचारी दोघांनाही अडथळा निर्माण होतो.

पार्किंगसाठी कमाल दर निश्चित करणे, पार्किंग व्यवस्थापन, पार्किंग मार्शल आणि उपलब्ध जागांचा योग्य वापर यासारख्या उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. घरापासून सार्वजनिक वाहतुकीपर्यंतची सुविधा मजबूत करण्याच्या विषयावर वास्तुविशारद विवेक पै यांनी मत व्यक्त केले. नागरिकांना घरापासून पादचारी मार्ग, सायकल मार्ग, रिक्षा थांबे आणि फिडर बसची सुविधा मिळणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक, पादचारी आणि सायकलस्वारांना प्रथम प्राधान्य, त्यानंतर ऑटो-रिक्षा आणि बस, तर खासगी वाहनांना शेवटचे प्राधान्य या क्रमाने वाहतूक नियोजन केल्यास ठाणे शहराचा कायापालट होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.