Thane Integral Ring Metro Update: ठाणे शहरात मेट्रो ४ आणि ५, बोरिवली-ठाणे भुयारी मार्ग, साकेत – माजिवडा उन्नत मार्ग अशा विविध प्रकल्पांसाठी वृक्षांचे बळी दिले जात असताना आता नव्याने तयार होणार्या ठाणे शहरातील अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पामुळे तब्बल ३ हजाराहून अधिक वृक्षांवर कुर्हाड चालविली जाणार आहे.
यातील ५१९ वगळता उर्वरित वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. पुनर्रोपण केलेले वृक्ष जगत नसल्याचा दावा पर्यावरणवाद्यांकडून केला जातो. त्यामुळे येत्या काही दिवसांत ठाण्यातील वृक्षसंपदा नव्या प्रकल्पांच्या रेट्यामुळे नष्ट होण्याची भीती आहे. शहरात गेल्या काही वर्षांत वाहतूक कोंडीची गंभीर स्थिती आहे. मागील काही वर्षांपासून शहरात मेट्रो, भुयारी मार्ग, उन्नत मार्ग, रस्ता रुंदीकरण, जलवाहिनी टाकणे अशी विविध कामे सुरू असल्याने रस्त्यातील खोदकामे, मालवाहतूक वाहनांमुळे कोंडीत भर पडत आहे. वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे कोंडी सोडविण्यासाठी वर्तुळाकार अंतर्गत मेट्रो मार्गिका उभारण्याची घोषणा करण्यात आली.
२ हजार ६९३ वृक्षांचे पुनर्रोपण
मेट्रोचा आराखडा पालिकेने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (महा मेट्रो) मदतीने तयार असून त्यासाठी १२ हजार कोटीहून अधिक खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्प उभारणीसाठी महामेट्रो आणि महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रकल्पासाठी शहरातील ३ हजार २१२ वृक्ष बाधित होणार आहेत. पैकी ५१९ वृक्ष पूर्णपणे कापणार असून २ हजार ६९३ वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. यातील अनेक वृक्ष देशी प्रजातीचे तर काही वृक्ष १५ वर्षांहून अधिक जुने आहेत.
पुनर्रोपण केलेल्या वृक्षांचे जगण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे वृक्षतोडीबाबत पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत पालिकेच्या वृक्ष आणि प्राधिकरण विभागाचे उद्यान अधीक्षक केदार पाटील, वृक्ष अधिकारी राजेश सोनावणे यांना वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
