ठाणे : ठाण्याच्या प्रस्तावित अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला नागरिकांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या शंका, हरकती आणि भीती दूर करण्यासाठी जनसुनावणी घेण्याबरोबरच विविध भागांत नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत घेतला आहे. याच बैठकीत कळवा-मुंब्रा-दिवा भागापर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासह चेंदणी कोळीवाडा आणि जुन्या ठाणे परिसराचा स्वतंत्र परिणाम मुल्यांकन (इम्पॅक्ट असेसमेंट) अहवाल तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

मुंबईतील सह्याद्री विश्रामगृहात झालेल्या बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, आमदार माधवी नाईक आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित होते. तर, आमदार निरंजन डावखरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीला उपस्थित होते. अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला विरोध नसल्याचे स्पष्ट करत, नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही विकास प्रकल्प राबवू नये, अशी भूमिका आमदार डावखरे यांनी मांडली. नागरिकांच्या हरकती, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी अधिकृत जनसुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली. अशीच मागणी त्यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सुचनेद्वारे उपस्थित केली होती.

प्रकल्पाची जनजागृती आवश्यक

  • ठाणे शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील सामान्य नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अभ्यासू व्यक्तींबरोबर चर्चा करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या शंकांचे समाधान करण्याची आवश्यकता आहे.
  • रिंग मेट्रोच्या कामामुळे नुकसान होणार नसून, ठाणेकरांना फायदा होईल. या प्रकल्पाबाबत ठाणेकरांमध्ये विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ठाण्यातील विविध भागात व नियोजित मेट्रोच्या स्थानकांच्या ठिकाणी परिसंवाद भरवावेत. त्यात महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी माहिती द्यावी, अशी सूचना आमदार नाईक यांनी केली.
  • दोन्ही आमदारांच्या मागणीला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जनसुनावणी आयोजित करण्यास तत्त्वतः मान्यता दिली. तसेच अंतर्गत मेट्रो मार्गावरील विविध भागांत परिसंवाद आयोजित करून नागरिकांना प्रकल्पाची माहिती दिली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या काळातही जनजागृतीसाठी माहिती फलक लावण्यात येणार आहेत.

अंतर्गत मेट्रो साडेतीन वर्षांत धावणार

ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचे संपूर्ण भूसंपादन आणि इतर तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यास हा प्रकल्प अवघ्या साडेतीन वर्षात पूर्ण करू, असा दावा व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी बैठकीत केला. अडीच वर्षांत पुणे मेट्रोचे वेगाने काम करण्यात आले. त्याच धर्तीवर ठाण्याचे काम पूर्ण करता येईल, असेही ते म्हणाले.

मेट्रो प्रकल्प विस्तार

कळवा, मुंब्रा आणि दिवा या वेगाने विकसित होत असलेल्या भागांचा मेट्रोच्या मूळ आराखड्यात समावेश नसल्याची बाब निदर्शनास आणून देत या भागांनाही मेट्रो सेवेशी जोडण्याची गरज असल्याचे आमदार डावखरे यांनी सांगितले. त्यानंतर या विस्तारासाठी आवश्यक डीपीआर तयार असून पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश शिंदे यांनी मेट्रो प्रशासनाला दिले.

चेंदणी कोळीवाड्याचा स्वतंत्र अहवाल

चेंदणी कोळीवाडा आणि जुन्या ठाणे परिसरातून मेट्रोचे भूमिगत काम होणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घरांच्या सुरक्षिततेबाबत निर्माण झालेल्या चिंतेचाही मुद्दा डावखरे यांनी बैठकीत उपस्थित केला. यावर मेट्रो प्रशासनाने कोणत्याही घराला धोका होणार नसल्याचा दावा केला. दरम्यान, नागरिकांचा विश्वास वाढावा यासाठी या संपूर्ण परिसराचा सविस्तर स्वतंत्र परिणाम मुल्यांकन (इम्पॅक्ट असेसमेंट) अहवाल तयार करण्याचे निर्देशही शिंदे यांनी बैठकीत दिले.