ठाणे : ठाणे शहरातील प्रस्तावित अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाविरोधात रविवारी ‘ठाणे अगेन्स्ट इंटिग्रल रिंग मेट्रो’ या नागरी मंचाच्या कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करुन प्रकल्पाविरोधात आंदोलन केले. मागील रविवारी स्वाक्षरी अभियान घेण्यात आले होते. त्यानंतर आता मानवी साखळी तयार करुन आंदोलन झाल्याने आता अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाला विरोध वाढू लागल्याचे चित्र आहे.
ठाणे शहरातील अंतर्गत भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठाणे महापालिका आणि महामेट्रोच्या माध्यमातून अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोची निर्मिती करत आहेत. परंतु या प्रकल्पाच्या निर्माण कामामुळे वृक्षतोड, नागरिकांचे विस्थापन, वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने विविध भागात या प्रकल्पाला विरोध होऊ लागला आहे. मागील रविवारी स्वाक्षरी मोहिमेनंतर रविवारी, ६ सप्टेंबरला ठाणे अगेन्स्ट इंटिग्रल रिंग मेट्रो या नागरी मंचाच्या वतीने पोखरण रोड क्रमांक २ येथे (स्वामी जंक्शन ते प्रशांत कॉर्नर पर्यंत) नागरिकांनी मानवी साखळी करून आपला रोष व्यक्त केला. या आंदोलनात शहरातील नोकरदार, व्यावसायिक आणि पर्यावरणप्रेमींनी सहभाग नोंदवला.
अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पामुळे मोठ्याप्रमाणात वृक्षतोड होत आहे. या वृक्षांचे पूनर्रोपण होत नाही. पूनर्रोपण झाले तरीही ८० टक्के वृक्ष जीवंत राहू शकत नाही. या प्रकल्पाची ठाणेकरांना गरज नाही. मेट्रो चार आणि पाच पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रवासी संख्या किती आहे ते तपासा आणि त्यानंतर अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोची गरज आहे का, त्याचा अभ्यास करा. – ॲड. राधिका राणे, आंदोलक.
ठाण्याला अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोची आवश्यकता नाही तर, स्वच्छ आणि हरित ठाण्याची आवश्यकता आहे. सरकारने या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. – मेघना जाधव, आंदोलक.
महापालिका निवडणुकीनंतर मागील ६ महिन्यांपासून वृक्ष प्राधिकरण समिती गठीत झालेली नसताना, सर्वसाधारण सभेने ३,९०० वृक्ष तोडण्यास दिलेली मंजुरी पूर्णपणे बेकायदेशीर आहे. या समितीत नागरिकांचे कोणतेही प्रतिनिधित्व नाही, त्यामुळे हा केवळ औपचारिकता पूर्ण करण्याचा दिखावा आहे. या बेकायदेशीर वृक्षतोडीवर मी आक्षेप नोंदवला असूनही मला सुनावणीसाठी बोलावले गेलेले नाही. जर प्रशासनाने जनसुनावणीशिवाय एकाही झाडाला हात लावला, तर गेल्या ६ महिन्यांत दिलेल्या सर्व वृक्षतोडीच्या परवानग्यांना मी न्यायालयात आव्हान देईन. -रोहित जोशी, आंदोलक.
