ठाणे : ठाण्यातील अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोचे प्राथमिक काम सुरू झाले असले, तरी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सविस्तर माहिती नागरिकांसह नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनाही देण्यात आली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वर्तुळाकार मेट्रोची आवश्यकता, तिचे फायदे-तोटे, पर्यावरणावरील परिणाम व ठाण्याच्या भविष्यातील लोककेंद्री वाहतूक व्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी रविवारी विशेष नागरिक सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठी विज्ञान परिषद, मुंबई आणि जिज्ञासा, ठाणे यांच्या वतीने ‘ठाणे शहरासाठी लोककेंद्री वाहतूक कशी असावी?’ या विषयावर ही सभा आयोजित करण्यात आली आहे. रविवार, २ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत नौपाड्यातील सरस्वती विद्यालय येथे होणाऱ्या या सभेत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभय ओक व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची विशेष उपस्थिती असेल.

ठाणे शहरात गेल्या काही वर्षांत वाहनसंख्येत मोठी वाढ झाली असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे. परिणामी शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील सुधारणा, घोडबंदर रोड, ठाणे खाडीवरील पूल, आनंदनगर – साकेत उन्नत मार्ग, खाडीकिनारी सहापदरी मार्ग, बोरिवली-ठाणे बोगदा, तसेच कासारवडवली-वडाळा व ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो यांसारखे अनेक प्रकल्प सुरू आहेत.

या कामांमुळे सध्या शहरातील वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला असून भविष्यातील वाहतूक नियोजनाबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे वर्तुळाकार मेट्रोची संकल्पना, पर्यावरणीय परिणाम, सार्वजनिक बस सेवा, रेल्वे व मेट्रो स्थानकांशी जोडणी, पादचारी सुविधा व प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठीची वाहतूक (लास्ट माइल कनेक्टिव्हिटी) यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या सभेत सविस्तर चर्चा होईल. सभेत ठाण्याचा विकास, शहराचे बदलते स्वरूप, वाहतूक समस्यांचा आढावा, सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांची सद्यस्थिती व लोककेंद्री वाहतूक व्यवस्थेची संकल्पना यावर सादरीकरण केले जाईल.

निकिता सराफ, तृप्ती बिवालकर, उन्मेष बागवे, सुलक्षणा महाजन व रचना चौबळ हे विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. तसेच समीर शेख, प्राची देशपांडे, शार्दूल मणेरीकर व विवेक पै हे सार्वजनिक वाहतूक, पादचारी सुविधा, पार्किंग धोरण व प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठीची वाहतूक या विषयांवर मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाच्या शेवटी नागरिकांसाठी प्रश्नोत्तरांचे सत्रही आयोजित करण्यात आले असून, ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.