ठाणे : ग्रामस्थांच्या तक्रारी किंवा अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने महत्त्वाचे पाऊल उचलले असून पंचायत समिती स्तरावर तालुका सुविधा समिती योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेचे अधिकारी पंचायत समितीत जाऊन ग्रामस्थांच्या शंकांचे निराकरण करणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली.
सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन शासन स्तरावर राबविण्यात येतो. त्याच धर्तीवर शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ठाणे जिल्हा परिषदेत १०० दिवसांचा कृती कार्यक्रम अंतर्गत पंचायत समिती स्तरावर तालुका सुविधा समिती योजना तयार करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका सुविधा समितीतील अधिकारी पंचायत समितींना भेट देणार आहेत. आज, पासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे.
प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हा उपक्रम राबविला जाणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांनी दिली.-
अर्ज कसा करावा
१. अर्ज विहित नमुन्यात असावा.२. तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे
३. तालुका सुविधा समिती योजना दिनाकरीता अर्जदाराने अर्ज १५ दिवस अगोदर २ प्रतीत पाठविणे आवश्यक आहे.
या विषयांचे अर्ज स्विकारले जाणार
१) विविध योजना आणि पायाभूत सुविधांबाबत ग्रामस्थांच्या प्राप्त झालेल्या तक्रारी२) जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांच्या लेखी तक्रारी
३) ग्रामस्तरावर औद्योगिक गुंतवणुक करणाऱ्या उद्योजकांच्या अडचणी निराकरण करण्यासाठी त्यांचे प्राप्त निवेदन४) व्यापारी आणि कामगार वर्गांच्या संघटनांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी सोडविणे
हे अर्ज स्विकारले जाणार नाही
न्यायप्रविष्ठ प्रकरणं, अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक, विहित नमुन्यात नसणारे तसेच त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती जोडले नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देणार आहे अशा प्रकरणाची पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसलेले अर्ज तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या, लोकप्रतीनिधीच्या, संस्थेच्या आणि कोणत्याही प्रकारच्या लेटर हेडवरील अर्ज स्विकारले जाणार नाही.
तक्रारींचे निराकरण एका महिन्याच्या आत होणार
अर्जदाराला अंतिम उत्तर तालुका सुविधा समिती योजना कार्यक्रमानंतर शक्य तितक्या लवकर एक महिन्याच्या आत देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी या तालुका सुविधा समिती योजना कार्यक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.