ठाणे : शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच ठाणे महापालिका मुख्यालयाच्या समोर असलेल्या कचराळी तलाव परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने तेथून दुर्गंधी पसरत आहे. यामुळे सकाळ आणि सायंकाळ फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय येथे विद्युत व्यवस्थेचाही अभाव आहे. या संदर्भात महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पाचपाखाडी परिसरात ठाणे महापालिकेचे मुख्यालय असून, त्याच समोर कचराळी तलाव आहे. ‘तलावांचे शहर’ म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात ही ओळख टिकवण्यासाठी गेल्या काही वर्षांत तलाव परिसराचे सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. तसेच तलावात जलशुद्धीकरण यंत्रणाही बसविण्यात आली आहे.

नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी पथवे तयार करण्यात आला असून, येथे सकाळ आणि सायंकाळ लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. मात्र, एकीकडे तलाव परिसराच्या सुशोभीकरणाचा दावा केला जात असताना, दुसरीकडे येथे उभारलेल्या मूलभूत सोयीसुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कचराळी तलाव परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिक विजय कुळकर्णी (वय ८६) यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. त्यांनी यापूर्वी २०१७ सालीही महापालिकेला पत्र देऊन विविध समस्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यापैकी काही कामे पूर्ण झाली असली तरी स्वच्छतागृहासंबंधित समस्या अद्यापही कायम असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

स्वच्छतागृहांमध्ये अनेकदा पाणी उपलब्ध नसते, पाईप तुटलेले आहेत, तसेच विद्युत सुविधा नाही. दरवाजे व्यवस्थित लागत नाहीत आणि नियमित साफसफाईचा अभाव असल्याने तेथे कायम दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, असे कुळकर्णी यांनी सांगितले.

या संदर्भात अनेक वेळा निवेदने देऊन तसेच प्रत्यक्ष भेट घेऊनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कचराळी तलाव परिसरातील स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची आणि स्वच्छतेची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.