ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आरोग्य सुविधेवरून प्रशासनाच्या कारभारावर सातत्याने टिका होत असतानाच, आता रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाला देण्यात आलेल्या रात्रीच्या जेवणात चक्क झुरळ आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे रुग्णांनी संताप व्यक्त केला तर, जेवण पुरवठादार ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकून त्याच्यासह जबाबदार रुग्णालय अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मनसेनी केली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय पुन्हा एकदा गंभीर निष्काळजीपणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. २८ ऑगस्ट रोजी रात्री रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी एक रुग्ण दाखल झाला. या रुग्णाला जेवणाचे ताट देण्यात आले होते. रुग्ण जेवण घेत असताना ताटातील अन्नामध्ये झुरळ दिसून आले. हा प्रकार समोर येताच वॉर्डातील रुग्णांमध्ये तीव्र संताप उसळला, असा आरोप मनसेचे जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे.
कळवा रुग्णालयात ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि ग्रामीण भागातून दररोज हजारो सामान्य नागरिक उपचारासाठी दाखल होतात. येथे दररोज सुमारे एक हजारहून अधिक रुग्णांना जेवण पुरवले जाते. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या निकृष्ट दर्जाबाबत यापूर्वीही वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मात्र, प्रशासनाने या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष केले. रुग्णांच्या आरोग्याशी आणि जिवाशी थेट संबंधित असलेल्या अन्नाबाबत असा निष्काळजीपणा समोर आल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
सध्या राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यपदार्थांच्या सुरक्षेबाबत धडक कारवाया सुरू आहेत. असे असताना ठाण्यातील सरकारी रुग्णालयात एवढा अक्षम्य प्रकार घडूनही अन्न व औषध प्रशासन गप्प का बसले आहे,असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच रुग्णालयातील स्वयंपाकघर, अन्न तयार करण्याची व साठवणुकीची प्रक्रिया अन्न सुरक्षा मानकांनुसार तपासण्याची मागणी केली. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे.
रुग्णांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. या प्रकरणी संबंधित जेवण पुरवठादार ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकून त्याच्यावर तसेच जबाबदार रुग्णालय अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. रुग्णालय प्रशासनानेही या घटनेस दुजोरा देत याप्रकरणी कायदेशीर चौकशीची प्रक्रीया सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे.
