ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांनी २० वर्षीय तरुणीच्या पोटातील साडेआठ किलो वजनाची गाठ यशस्वीरीत्या बाहेर काढली. अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांनी ही माहिती दिली. मूत्रपिंड, स्वादुपिंड व मोठ्या रक्तवाहिन्यांच्या अगदी लगत असलेल्या या गाठीमुळे शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने ती यशस्वी करून महापालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय क्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती दिली.
गेले सहा महिने २० वर्षीय महिला पोटदुखी व पोटाला येणाऱ्या सुजेमुळे त्रस्त होती. उपचारांसाठी केल्या जाणाऱ्या तपासणीत तिच्या पोटाच्या डाव्या बाजूचा भाग ओटीपोटापासून उदरापर्यंत मोठ्या गाठीने व्यापल्याचे दिसून आले. सूक्ष्म तपासणीत सुमारे दीड फूट लांब व एक फूट रुंद आकाराची गाठ निदर्शनास आली.
गाठीचा इतर अवयवांवर थेट परिणाम झाला नव्हता. त्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. सर्जरी विभागातील डॉ. वर्षा पाटील, डॉ. क्षितीज माने, डॉ. शुभम मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.
विभागप्रमुख डॉ. अरुण माने यांनी मार्गदर्शन केले. भूलतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. विजय पाटील व डॉ. केतकी पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संजना पाटील यांनी भूल दिली. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम व अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगांवकर यांचेही सहकार्य लाभले.
शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली असून गाठ काढल्यानंतर तिचे वजन सुमारे सहा ते सात किलोने कमी झाले आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, पोटाच्या मागील भागात (रेट्रोपेरिटोनियल भागात) एवढ्या मोठ्या आकाराच्या गाठी अत्यंत दुर्मीळ असतात. मूत्रपिंड, स्वादुपिंड व मोठ्या रक्तवाहिन्यांच्या अत्यंत लगत असल्याने अशा गाठींवरील शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक मानली जाते. अशा स्थितीत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीरीत्या ही शस्त्रक्रिया पार पाडली असल्याचे अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांनी सांगितले.
