ठाणे : येत्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागामध्ये गेल्या तीन वर्षात झालेल्या विकासकामांमध्ये अपहार झाल्याचा संशय राष्ट्रवादीचे नेते आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. एकाच विकासकामांवर दोनदा खर्च झाल्याचा आरोप करत या कामांच्या चौकशीसाठी त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरिक्षण करावे, अशी मागणी करत यासंबंधीचे पत्र त्यांनी पालिका आयुक्तांना दिल्याने खळबळ उडाली आहे.

राज्यातील सत्तातरणाचा केंद्रबिंदू असलेल्या ठाणे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागलेले असते. याच जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना सातत्याने कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केले जात आहे. सत्तेत सामील झालेल्या अजित पवार गटाकडूनही आव्हाड यांच्यावर टिका केली जात आहे. तसेच अजित पवार गटाने कळवा आणि मुंब्रा भागावर लक्ष केंद्रीत करत आव्हाड यांच्याविरोधात निवडणुक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात हा परिसर येतो. आव्हाड आणि श्रीकांत शिंदे यांचे फारसे जमत नसून हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात शहकाटशहाचे राजकारण करताना दिसून येतात. राज्यातील सत्ताबदलानंतर राज्य शासनाने दिलेल्या निधीतून ठाणे महापालिकेने कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात विविध विकास कामे केली असून या कामांमध्ये अपहार झाल्याचा संशय जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : आषाढ सहलीनंतर श्रावणात तीर्थयात्रा

जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची पालिका मुख्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर महापालिकेचे जेवढे आयुक्त होऊन गेले आहेत, तेवढ्यांनी कळवा मुंब्र्यात प्रचंड सहकार्य केले आहे. अशाच प्रकारे सहकार्याची अपेक्षा आम्हाला या आयुक्तांकडे असल्याचेही त्यांनी भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. खूप दिवसात सगळ्या माजी नगरसेवकांची भेट झाली नव्हती. त्या सगळ्यांनी भेटायची इच्छा होती. त्यांच्या वॉर्ड मधील छोटी छोटी काम होती, ती मार्गी लागावी म्हणून आम्ही आयुक्तांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या भेटीदरम्यान त्यांनी पालिका आयुक्तांना एक पत्र दिले असून त्यात कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात गेल्या तीन वर्षात झालेल्या कामात अपहार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात विकास कामे करण्यासाठी राज्य शासनाकडून विकास निधी वर्ग करण्यात आला. पण, या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने झालेला नसल्याचे निदर्शनास आल्याचे आव्हाड यांनी पत्रात म्हटले आहे. गेल्या तीन वर्षात एकाच रस्त्याचे दोन वेळा बांधकाम, एकाच विषयावर दोन वेळा झालेला खर्च याची चौकशी लावण्यात यावी. तसेच जनतेच्या करातील मिळालेल्या पैशांचा अपहार असल्याने ही चौकशी त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरिक्षण करून करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे या भागातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.