ठाणे : नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदरपाठोपाठ आता खाडी पल्ल्याड असलेल्या कळवा आणि मुंब्रा भागात गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या जाणवत असून गेल्या तीन ते चार दिवसांपासून ही समस्या अधिक तीव्र झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. टँकरही उपलब्ध होत नसल्यामुळे कळवा आणि मुंब्रावासिय मेटाकुटीला आल्याचे चित्र आहे. दरम्यान, एमआयडीसीकडून दुरुस्ती कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने ही समस्या निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहराला प्रत्यक्षात दररोज ५९० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या मानाने शहराला प्रतिदिन ६२१ दशलक्षलीटर इतक्या पाण्याची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र, ५९० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत असून शहराला ३१ दशलक्षलीटर इतके पाणी कमी मिळत आहे.

वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागातील अनेक संकुलांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहेत. घोडबंदर येथील ग्रीन स्क्वेअर या संकुलात दररोज चार ते पाच टँकर पाणी विकत घ्यावे लागत असून गेल्या पंधरा दिवसांपासून ही समस्या निर्माण झाल्याचे संकुलातील पदाधिकारी जनार्दन लाड यांनी सांगितले. वागळे इस्टेट मधील लोकमान्य-सावकरनगर परिसरातही टंचाईची समस्या होती. मात्र, ही समस्या आता काही प्रमाणात सुटल्याचे नागरिकांनी सांगितले.

घोडबंदरपाठोपाठ कळवा आणि मुंब्रा भागात गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. मुंब्रा परिसरात १६ फेब्रुवारीपासून पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली असून गेल्या तीन ते चार दिवसांपासून ही समस्या अधिक तीव्र झाल्याचे नागरिकांनी सांगितले. कळवा परिसरातही अशीच काहीशी परिस्थीत आहे. कळवा भागात आधी व्यवस्थित पाणी येत होते. परंतु आता गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाणी कमी प्रमाणात येत आहे. यामुळे टंचाईची समस्या निर्माण झाली आहे, असे कळव्यातील रहिवाशी विश्वास कुंटे यांनी सांगितले.

कळवा परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या अधिक तीव्र झाली आहे. नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. एमआयडीसीकडून पाणी पुरवठा होत नसल्यामुळे ही टंचाई असल्याचे पालिका प्रशासन सांगत आहे. परंतु आम्हाला एमआयडीसी ऐवजी पुर्णपणे स्टेम द्वारेच पाणी पुरवठा करण्यात यावा, ही आमची मागणी आहे. -मंदार केणी, नगरसेवक, शिवसेना

मुंब्रा परिसरात १६ फेब्रुवारीपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. टँकरही उपलब्ध होत नाहीत. कल्याण नाका ते वायजंक्शनपर्यंत अनिधकृत गोदामे, माॅल आणि धाब्यांसाठी मुख्यवाहीनीवर बेकायदा नळजोडणी घेण्यात आल्याने शहरात पुरेसे पाणी येत नाही. पालिकेने मोठ्या प्रकल्पांऐवजी पाणी समस्या सोडविण्यावर भर दिला पाहिजे. -अशरफ (शानू) पठाण, विरोधी पक्ष नेता. ठाणे महापालिका

प्रशासनाचे म्हणणे

एमआयडीसीने विविध तांत्रिक बिघाड, वीज पुरवठा खंडीत आणि जलवाहिनी दुरुस्ती अशा कामांसाठी गेल्या सहा महिन्यात आठ वेळा पाणी पुरवठा बंद ठेवला होता. त्यापैकी फेब्रुवारी महिन्यात तीनदा म्हणजेच, ६, २० आणि २१ फेब्रवारी यादिवशी पाणी पुरवठा बंद ठेवला होता. बंदनंतर पाणी पुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागतो. यामुळे एमआयडीसीकडून पाणी पुरवठा होणाऱ्या कळवा आणि मुंब्रा परिसरात पाणी टंचाई समस्या निर्माण झाली होती. परंतु आता ही समस्या काही प्रमाणात कमी होऊन रुळावर येत आहे. तसेच ठाणे महापालिका आणि स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे, घोडबंदर भागात पाणी पुरवठा करण्यात येतो. डिसेंबर महिन्यात पालिकेच्या योजनेतील जलवाहीनी फुटल्याने शहरात १५ दिवस पाणी पुरवठ्यात ३० टक्के कपात झाली होती. मुंबई महापालिकेकडून नदी पात्रात गेटचे काम करण्यात येत असल्यामुळे ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात आली होती. तसेच एकदा वाहिनीवरील वाॅल बदलण्यासाठी २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. यामुळे ही टंचाई निर्माण झाल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.

विविध तांत्रिक कारणांमुळे एमआयडीसी आणि पालिकेचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्यामुळे घोडबंदर, कळवा, मुंब्रा भागात टंचाई समस्या निर्माण होत आहे. परंतु आता पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरू झाल्याने लवकरच पाणी पुरवठा पुर्वपदावर येईल. – विनोद पवार, उपनगर अभियंता, ठाणे महापालिका

कोणत्या भागाला किती पाणी पुरवठा होतो

ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर म्हणजेच माजीवाडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात ११० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत होता. वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात ५७ दशलक्षलीटर, कळवा प्रभाग समिती क्षेत्रात ७२ दशलक्षलीटर, दिवा प्रभाग समिती क्षेत्रात ५८.६० दशलक्षलीटर, मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात ६६ दशलक्षलीटर, वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्रात ५३ दशलक्षलीटर, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात ६० दशलक्षलीटर, उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात ५३ दशलक्षलीटर, नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रात ३४.४० दशलक्षलीटर असा एकूण ५९० दशलक्षलीटर इतका प्रतिदिन पाणी पुरवठा होतो.