कल्याण – कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरातील नागरिकांसाठी दिवाळीत मेट्रोच्या रूपाने विकासाची मोठी भेट मिळाली आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका टप्पा ५ च्या पुढील टप्प्यांसह मेट्रो मार्गिका ५ अ च्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वतीने ४ हजार ५६४ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या पुढील कामांना गती मिळणार आहे.

कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या मेट्रो मार्गिकांच्या उभारणीसाठी सातत्याने आग्रही होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून या मेट्रो मार्गिकांच्या उभारणीला गती मिळाली आहे. मेट्रो मार्गिका ५ आणि तिच्या विस्तारित टप्प्यांसंदर्भात खासदारांनी शासन तसेच एमएमआरडीएच्या स्तरावर वारंवार बैठका घेऊन पाठपुरावा केला आहे. या प्रयत्नांमुळे आता मेट्रो ५ च्या पुढील टप्प्यांसह मेट्रो ५ अ च्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. सुधारित मेट्रोच्या मार्गरेखेला राज्य शासनाची मान्यता मिळाली. एमएमआरडीएकडून पुढील टप्प्यांच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

मेट्रो मार्गिका

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका ५ च्या पहिल्या टप्प्यात कापूरबावडी ते धामणकर नाका या मार्गिकेचे काम सुरू आहे. या पुढील विस्तारामध्ये धामणकर नाका ते रांजणोली, रांजणोली ते भोईरवाडी (व्हाया दुर्गाडी मार्गे) असा टप्पा असणार आहे. यामध्ये भिवंडी मधील अरुंद आणि गर्दीचे रस्ते पाहता धामणकर नाका ते टेमघर इतका मार्ग भुयारी पद्धतीने उभारला जाणार आहे तर उर्वरित उन्नत मार्ग असेल. तर ५ अ मध्ये भोईरवाडी ते कल्याण स्थानक आणि भोईरवाडी ते उल्हासनगर ( अंबरनाथ जिएनपी गॅलेक्सि ) अशा पद्धतीने मेट्रो ५ आणि त्याचा विस्तारित भागाची उभारणी करण्यात येणार आहे. रांजणोली जंक्शन ते दुर्गाडी या परिसरात मेट्रो मार्गिकेसोबत उड्डाणपुलाची एकत्रित रचना असलेला डबल डेकर मार्ग उभारण्याचे नियोजन आहे. भिवंडीतील धामणकर नाका परिसरापासून पुढे दुर्गाडी, खडकपाडा, भोईरवाडी आणि कल्याण स्थानकापर्यंत मेट्रोचे जाळे विस्तारल्याने या शहरांमधील परस्पर संपर्क अधिक सुलभ होणार आहे.

रस्ते मार्ग खुले

मेट्रो सुरू झाल्यानंतर रस्त्यांवरील खासगी वाहनांचा भार कमी होण्यास मदत होईल. नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होईल. त्याचबरोबर मध्य रेल्वे, मेट्रो मार्गिका ४ आणि प्रस्तावित मेट्रो मार्गिका १२ यांच्याशी जोडणी अधिक सक्षम होऊन संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील दळणवळण व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

निविदा प्रसिध्द

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका ५ च्या पहिल्या टप्प्यात कापूरबावडी ते धामणकर नाका या मार्गिकेचे काम सुरू आहे. या पुढील विस्तारामध्ये धामणकर नाका ते रांजणोली, यानंतर रांजणोली ते भोईरवाडी (व्हाया दुर्गाडी) मार्गे असा टप्पा असणार आहे. यामध्ये भिवंडी मधील अरुंद आणि गर्दीचे रस्ते पाहता धामणकर नाका ते टेमघर इतका मार्ग भुयारी पद्धतीने उभारला जाणार आहे तर उर्वरित उन्नत मार्ग असेल. तर ५ अ मध्ये भोईरवाडी ते कल्याण स्थानक आणि भोईरवाडी ते उल्हासनगर ( अंबरनाथ जिएनपी गॅलेक्सि ) अशा पद्धतीने मेट्रो ५ आणि त्याचा विस्तारित भागाची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी एकूण ४ हजार ५६४ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

डबल डेकरचे जाळे

भिवंडीहून येणारी मेट्रो ५ ची डबल डेकर मार्गिका कोनगावपर्यंत येणार असून, कोनगाव येथून या मार्गिकेचा एक फाटा कल्याण एपीएमसीच्या दिशेने जाणार आहे. कोनगावपासून मेट्रो मार्गिका ५ चा विस्तार भोईरवाडीपर्यंत करण्यात येणार आहे. भोईरवाडी येथून पुढे मेट्रो मार्गिका उल्हासनगरच्या प्रवेशद्वारापर्यंत, म्हणजे सध्या उन्नत रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणापर्यंत जाणार आहे. त्यानंतर जगदीश दूध डेपो परिसरापासून उल्हासनगरपर्यंत डबल डेकर मार्गिकेची उभारणी करण्यात येणार आहे.