ठाणे – दिवाळी आणि छठ उत्सवासाठी गावी जाणाऱ्या ठाणेकरांसाठी मध्य रेल्वेने अतिरिक्त विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. एलटीटीहून सुटणाऱ्या समस्तीपूर, दानापूर, संतरागाछी आणि बनारस विशेष गाड्यांना ठाणे व कल्याण येथे थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे शहर आणि परिसरातील प्रवाशांना उत्तर भारतासह पूर्वेकडील शहरांकडे जाण्यासाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहेत.

दिवाळी, छठ आणि पूजा उत्सवाच्या काळात उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. या काळातील अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जात आहेत. याआधी जाहीर केलेल्या गाड्यांसह आता उत्सव विशेष गाड्यांची संख्या ५८० झाली आहे. ठाणे स्थानकावरून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी उत्तर भारताकडे प्रवास करतात. त्यामुळे ठाणे-कल्याणमार्गे धावणाऱ्या या विशेष गाड्यांमुळे सणासुदीच्या काळातील प्रवाशांना अतिरिक्त रेल्वेसेवा उपलब्ध होणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन १६२ अतिरिक्त विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.

यातील लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणाऱ्या चार विशेष गाड्यांना ठाणे आणि कल्याण स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस–समस्तीपूर साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडीला ठाणे, कल्याणसह नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, प्रयागराज छिवकी, दीनदयाल उपाध्याय जंक्शन, दानापूर, पाटलिपुत्र, सोनपूर, हाजीपूर आणि मुजफ्फरपूर येथे थांबे आहेत. ही गाडी १३ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवारी एलटीटीहून सुटणार आहे.

एलटीटी–दानापूर विशेष गाडी ९ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबरदरम्यान दररोज धावणार असून तिलाही ठाणे आणि कल्याण येथे थांबा आहे. याशिवाय एलटीटी–संतरागाछी वातानुकूलित सुपरफास्ट विशेष गाडीला ठाणे, कल्याणसह नागपूर, रायपूर, बिलासपूर, टाटानगर आणि खडगपूर आदी स्थानकांवर थांबे आहेत. ही गाडी ६ ते २७ ऑक्टोबरदरम्यान दर मंगळवारी धावणार आहे.

एलटीटी–बनारस साप्ताहिक विशेष गाडीही ठाणे आणि कल्याण येथे थांबणार आहे. ही गाडी १८ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरदरम्यान दर रविवारी एलटीटीहून सुटेल.दरम्यान, या विशेष गाड्यांपैकी 01043, 01143, 01107, 05168, 01483 आणि 01411 या गाड्यांचे आरक्षण २ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. प्रवाशांना संगणकीकृत आरक्षण केंद्रांसह आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून आरक्षण करता येणार आहे. अनारक्षित डब्यांसाठी यूटीएस प्रणालीचा वापर करता येईल. रेल्वेने तिकीट आरक्षणासाठी ‘रेलवन’ ॲपचाही पर्याय उपलब्ध करून दिला आहे.