ठाणे : ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांमध्ये सत्तासहभागावरून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये दबावतंत्राचे राजकारण सुरू होते. यामुळे महापौर कुणाचा होणार, अशी चर्चा सुरू असतानाच, शुक्रवारी दाखल झालेल्या अर्जानुसार, तिन्ही ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा महापौर तर, भाजपचा उपमहापौर होणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५, शिवसेना (उबाठा) १, अपक्ष १ असे १३१ नगरसेवक निवडून आले. शिंदे गटाने बहुमताचा आकडा पार केला आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक युतीत लढविण्यात आली असल्यामुळे महापौर पद द्या अन्यथा विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावू, असा हट्ट धरणार्या भाजपने अखेर माघार घेत शिवसेना (शिंदे गट) पक्षाबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
शिवसेना (शिंदे गट) पक्षातर्फे महापौर पदासाठी शर्मिला पिंपळोलकर तर भाजपतर्फे उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांनी पालिका सचिव मनीष जोशी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल झालेले नसल्यामुळे दोघांची बिनविरोध निवड झाली.
कल्याण-डोंबिवली पालिका महापौरपदी शिवसेनेच्या ॲड. हर्षली चौधरी-थविल, उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल दामले यांनी शुक्रवारी कल्याण-डोंबिवली पालिकेचे सचिव किशोर शेळके यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे कल्याण-डोंबिवली पालिकेत शिंदे गटाचा महापौर तर, भाजपचा उपमहापौर होणार आहे.
उल्हासनगरमध्ये काँग्रेस वगळून सर्व पक्ष सत्तेत
उल्हासनगर पालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकमेकांविरुद्ध लढले होते. शिंदे गटाने कलानी गट, साई पक्ष, रिपाइं, पीआरपी या पक्षांना बरोबर घेत निवडणूक लढवली. त्यानंतरही त्यांना अवघ्या ३६ जागांवर समाधान मानावे लागले होते.
भाजपने ३७ जागा जिंकल्या. त्यामुळे सत्तेचे गणित जुळवण्यासाठी ४० जागांसाठी शिंदे गटाने वंचित बहुजन आघाडी आणि एका अपक्षाला बरोबर घेतले. हे गणित जुळवताना त्यांनी वेगाने हालचाली केल्याने शिवसेना एकहाती सत्ता स्थापन करणार का, अशी चर्चा रंगली.
मात्र शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने महापौर पदासाठी अश्विनी निकम तर, उपमहापौर पदासाठी भाजपच्या वतीने अमर लुंड यांचा अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेत आता काँग्रेस पक्ष वगळता सर्व पक्ष सत्तेत आल्याचे चित्र आहे.

