MMRDA Metro Project Update: ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या कल्याण तळोजा मेट्रो १२, ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो ५ यांचा विस्तार करण्यात येणार आहे. याबाबत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी मार्गिका विस्तार प्रस्ताव मांडत याबाबत एम एम आर डी ए ला आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे आता मेट्रो १२ ही कळवा मुंब्रा येथे जाणार आहे. तर मेट्रो ५ ही बदलापूर पर्यंत आणि दुर्गाडी मार्गे टिटवाळ्यापर्यंत या मार्गिकेचा विस्तार करण्यात येणार आहे. मेट्रो मार्गिकांच्या या विस्तारामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरातून मेट्रो धावणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांबाबत एमएमआरडीए मुख्यालयात सोमवारी एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत मतदारसंघात सुरू असलेल्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी एमएमआरडीए आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, एमएमआरडीए अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल यांची मुख्य उपस्थिती होती. यावेळी बैठकीत विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ ची विस्तारित मार्गिका ५ अ दुर्गाडी नाका ते कल्याणमार्गे उल्हासनगरच्या कल्याण – बदलापूर मार्गाने बदलापूर आणि अंबरनाथ शहराच्या मध्यभागी उभे राहत असलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यात येणार आहे. यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे गाठणे सोपे होणार आहे. याबाबत एमएमआरडीएकडून आराखडा तयार करण्यात येत आहे. तर मेट्रो ५ ब ही मेट्रो मार्गिका चिखलोली रेल्वे स्थानकापासून थेट बदलापूर पर्यंत नेण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा. तर दुर्गाडी येथून थेट टिटवाळा पर्यंत जाण्यासाठी ५ क मेट्रो मार्गिका उभारण्यासाठी ही आराखडा तयार करण्यात यावा. अशा सूचना यावेळी खासदार डॉ.शिंदे यांनी दिल्या. या दोन्ही मार्गिका झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि कल्याण पलिकडच्या नागरिकांना ठाणे, नवी मुंबई, मुंबई गाठण्यासाठी विविध मेट्रो मार्गिका उपलब्ध असतील. याबाबत एमएमआरडीए आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
कळवा मुंब्रा येथे धावणार पहिली मेट्रो
कल्याण तळोजा मेट्रो १२ चे काम देखील सध्या जलदगतीने सुरू आहे. यातील मार्गात पिलर उभारणीचे, तसेच स्थानक उभारणीचे काम सुरू आहे. याच समवेत १२ अ कल्याण फाटा ते दहिसर मोरी मार्गे तळोजा देखील नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. यानंतर आता मेट्रो १२ ब चा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये मेट्रो १२ ची एक विस्तारित मार्गिका ही शिळफाटा मार्गे, मुंब्रा – कळवा येथून जाईल आणि त्याची जोडणी पुढे थेट ठाण्याला होईल.
एक्सेस कंट्रोलमुळे शहरांची जोडणी
कल्याण पलीकडच्या शहरातील नागरिकांना थेट मुंबई आणि नवी मुंबई गाठण्यासाठी एक्सेस कंट्रोल मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे तर या मार्गाला बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली तसेच पुढील सर्व शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाची जोडणी करण्याबाबत सूचना दिल्या. बदलापूर – काटई मार्गावरील अनधिकृत बांधकाम हटवून त्याचे रुंदीकरण करण्यात यावे. तर हा मार्ग बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली येथे जातो. तर या मार्गाची शहराच्या दुसऱ्या बाजूला देखील जोडणी करावी. डबल डेकर मार्गांच्या माध्यमातून आणि त्याची जोडणी ही या शहरांच्या एका बाजूने जाणाऱ्या एक्सेस कंट्रोल मार्गाला देखील करण्यात यावी. तर याच रस्त्यावरून मेट्रो १४ जात असून या मार्गिकेला ही याची जोडणी करण्यात येणार आहे.
जिल्ह्याला डबल डेकरचे कोंदण
कल्याण लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या सर्व मेट्रो मार्गिका या डबल डेकर पद्धतीने उभारण्यात येणार आहेत. यामध्ये कल्याण तळोजा मेट्रो १२, कांजूरमार्ग – बदलापूर मेट्रो १४, तसेच ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो ५, दुर्गाडी मार्गे कल्याण – उल्हासनगर – अंबरनाथ – चिखलोली येथे जाणारी ५ अ, शिळफाटा रांजणोली उन्नतमार्ग, वालधुनी ते नेवाळी उन्नत मार्ग हे सर्व वाहतूक प्रकल्प हे डबल डेकर अर्थातच खाली रस्ता वर फ्लायओव्हर आणि जेथून मेट्रो मार्गिका जाणार आहे त्याठिकाणी वरती मेट्रो मार्गिका असे स्वरूप असणार आहे. या प्रकल्पांच्या उभारणीसाठी एमएमआरडीए कडून काम सुरू आहे.
