ठाणे : महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार असून १७ हजाराहून अधिकचा बंदोबस्त ठाणे पोलिसांकडून तैनात केला जाणार आहे. यामध्ये १० हजार ९०८ पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि ६ हजार २९५ गृहरक्षकांचा सामावेश असेल. तसेच, बंदोबस्तासोबत प्रत्येक पोलीस ठाण्यात ड्रोनचा वापर केला जाणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी महापालिका क्षेत्र ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येते. चारही महापालिकांच्या एकत्र निवडणूक असल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान ठाणे पोलिसांसमोर आहे. युतीचे अनेक उमेदवार जिल्ह्यात बिनविरोध निवडून आल्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले होते. महापालिका निवडणूक प्रचार संपल्यानंतर १५ जानेवारीपर्यंत मतदारांना प्रलोभने दाखविणे किंवा इतर प्रकार होऊ शकतात. तसेच, कल्याण-डोंबिवली भागात युतीमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी ठाणे पोलिसांनी तयारी सुरु केली आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयातील आणि बाहेरील विभागातून आलेल्या विभागातील १० हजार ९०८ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच ६ हजार २९५ गृहरक्षक, राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) ६ तुकड्या आणि एक प्लाटून असे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले.
आचारसंहितेचा भंग होणार नाही त्यादृष्टीने प्रत्येक पोलीस ठाण्यात जास्तीत जास्त ड्रोन आणि कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवले जाईल. मतदानाच्या दिवशी ड्रोनचा अधिक वापर केला जाईल. तसेच अभिलेखावरील (रेकाॅर्डवरील) गुन्हेगारांची दैनंदिन तपासणी करुन गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घातला जाणार आहे.
