बौद्ध धर्माविषयी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी रबाळे पोलिसांनी केतकी चितळे हिला अटक केली आहे. शुक्रवारी केतकीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे केतकीच्या अडचणीत आता वाढ झालेली आहे. केतकीविरोधात २०२० मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात केतकी हिने समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी तिला ठाणे पोलिसांनी अटक केली होती. नुकतीच तिला न्यायालयाने याप्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. केतकी विरोधात यापूर्वी रबाळे पोलीस ठाण्यात बौद्ध धर्माविषयी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्यामुळे रबा‌ळे पोलिसांनी आता तिचा ताबा घेतला आहे. शुक्रवारी तिला न्यायालयात हजर केले. हा गुन्हा दोन वर्षांपूर्वी झाला होता. तसेच केतकीचा जबाब रबाळे पोलिसांनी यापूर्वीच घेतला होता. त्यामुळे तिला पोलीस कोठडीची आवश्यता नसल्याचे केतकीच्या वकिलांनी न्यायालयात म्हटले. तर, याप्रकरणाचा तपास करणे आवश्यक असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी याप्रकरणी तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane ketaki chitale remanded to police custody for atrocity case asj
First published on: 20-05-2022 at 13:37 IST