ठाणे : इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर सध्या गल्लीबोळामध्ये राहणाऱ्या तरुणांमध्ये कथित ‘भाई’ बनण्याचे आकर्षण वाढले आहे. यात आकर्षणातून या गल्लीबोळातील टोळक्यांनी एकमेकांविरोधात इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर लाईव्ह येऊन शिवीगाळ केली होती. या वादातून काहीजणांनी अल्पवयीन मुलाचे अपरहण करुन त्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, मारहाण झालेला १५ वर्षीय मुलगा वागळे इस्टेट येथील वाल्मिकी पाडा परिसरात राहतो. त्याचा वागळे इस्टेटमध्ये राहणारा मित्र आणि बाळकूममध्ये राहणाऱ्या तरुणाचे एकमेकांसोबत पूर्ववैमन्यस्य आहे. १५ मे या दिवशी त्याच्या मित्राने इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर ‘लाईव्ह’ येऊन बाळकूमध्ये राहणाऱ्या मुलाला शिवीगाळ केली होती. त्यानंतर पुन्हा १७ मे या दिवशी तो तरुण लाईव्ह आला. त्याने पुन्हा त्या मुलाला शिवीगाळ केली होती. या व्हिडीओमध्ये तक्रारदार मुलासह तिघेजण दिसत होता. त्याचदिवशी रात्री तक्रारदार तरुण वागळे इस्टेट येथील आंबेवाडी भागात त्याच्या मित्रासोबत उभा असताना, बाळकूम येथे राहणाऱ्या तरुणाचे काही सहकारी त्यांच्या दिशेने आले. त्यांनी ‘भाई’ला शिवीगाळ का केली असा जाब विचारला. मी शिवीगाळ केली नाही असे तक्रारदार म्हणाल्यानंतर आता भाईने तुला मारून टाकण्यास सांगितले आहे अशी त्यांनी धमकी दिली. त्यानंतर त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसविले. त्याला मध्यरात्री ३.३० वाजताच्या सुमारास अंबिकानगर येथील जलवाहिनीजवळ नेले. तिथे त्याला बेदम मारहाण झाली. काहीवेळाने परिसरातील रहिवासी तेथे आल्यानंतर त्याची सुटका झाली. मारहाण करणारी मुले तेथून पळून गेले. घरी आल्यानंतर त्याने याबाबतची माहिती वडिलांना दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर वडिलांनी सांगितल्यानंतर मुलाने वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११५ (२), १४० (१), १८९ (२), १९१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. यातील बहुतांश तरुण हे १७ ते २० वर्षांची मुले आहेत. गेल्याकाही वर्षांमध्ये इन्स्टाग्रामवर रील्स बनवून भाई बनण्याचे आकर्षण तरुणांमध्ये वाढत आहे. त्यामुळे या अशा गुंडप्रवृत्तीवर कारवाई होणार का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.