ठाणे : शासनाकडे वर्षेनुवर्षे प्रलंबित असताना याशिवाय न्यायालयाने शासकीय आणि गायरान जमिनीवर असणारे अतिक्रमण तोडण्याची सूचना दिलेली असतानाही ठाणे पूर्व भागातील चेंदणी कोळीवाड्यातील साईनगरीत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला कुठल्या आधारावर दिली असा सवाल गावठाण-कोळीवाडा- पाडे संवर्धन समितीने शासनाला विचारला आहे.
शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार न केल्यास आगामी महापालिका निवडणुकीत त्याचे पडसाद उमटतील असा इशारा समितीने दिला आहे. ठाण्यातील कोपरी साईनगरी परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविला जाणार आहे. सुमारे महिन्याभरापूर्वी त्याची अनुसूची जाहीर झाली असून आता याबाबत येथील गावठाण-कोळीवाडा-पाडे संपर्धन समितीने तीव्र संताप व्यक्त केला.
या संदर्भात समितीचे सुरेंन कोळी म्हणाले, ठाणे मुंबईत असणाऱ्या सुमारे ४० पेक्षा जास्त कोळीवाड्यांच्या विस्तारित गावठाण्यांच्या सीमा रेषा निश्चित कराव्यात अशी मागणी विविध कोळीवाड्यांच्या संघर्ष समिती , चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समिती विविध पातळ्यांवर करत आली आहे, त्यासाठी जिल्हाधिकारी, मंत्री, खासदार यांना पुराव्यासहित निवेदनही देण्यात आली आहेत. त्यामुळे जरी लेखी स्वरूपातील कुठलाही शासन निर्णय आलेला नसला तरी ठाणे मुंबईतील कोळीवाड्याना क्लस्टर आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून वगळल्याचे जाहीर करण्यात आले होते.
याशिवाय तत्कालीन तहसीलदार युवराज बांगर यांनी या ठिकाणी विविध न्यायालयांनी दिलेल्या आदेशानुसार याठिकाणी झालेले अतिक्रमण तोडण्याची तोडण्याची नोटीस १० एप्रिल २०२३ मध्ये याठिकाणी बजावली होती,असे असतानाही चेंदणी कोळीवाड्यातील अनधिकृत बांधकामांचा समावेश असलेल्या साईनगरीत झोपडपट्टी पुनर्वसन योजना कोणत्या आधारावर मंजूर करण्यात आली हा प्रश्न आहे. या योजनेला मान्यता देताना चेंदणी कोळीवाड्याच्या चतु:सीमेच्या कक्षेत झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याची मागणी स्थानिक कोळी समाजाने शासनाकडे केली होती का ? असा सवालही कोळी यांनी विचारला आहे.
प्रभागातील माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी किनारपट्टी नियमन क्षेत्रात तीस-एक वर्षांपूर्वी अनधिकृत उभारण्यात आलेल्या साई नगरीत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अंलबजावणीसाठी पाठपुरावा केला होता. चेंदणी कोळीवाड्यात खाडीत असलेल्या न.भू.क्रमांक २१२/अ, २१२/ब आणि रस्त्यालगतच्या काही भूभागावर साई नगरी वसलेली आहे. याठिकाणी विस्तारित गावठाण क्षेत्र करण्याची मागणी कोळी समाजाच्या चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समिती वर्षेनुवर्षे करत आलेली आहे. त्यामुळे ही मागणी डावलून ही योजना राबवली जाणार असल्याने त्याचे परिणाम महापालिकेच्या निवडणुकीत पहायला मिळतील असे सुरेंन कोळी यांनी सांगितले.
